ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती, मुलीचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:40 AM2018-08-22T09:40:03+5:302018-08-22T09:44:41+5:30
ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत.
पंकज रोडेकर
ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी जात असताना एका 23 वर्षीय विवाहितेला लोकल प्रवासादरम्यान प्रसूती वेदना सुरु झाल्याने त्या ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्या. त्यानंतर स्थानकावरील वन रूपी क्लिनिकमध्ये त्यांची प्रसूती करण्यात आली असून त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मंगळवारी (22 ऑगस्ट) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मायलेकी सुखरूप असून उपचारासाठी त्यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वर्षभरातील ही तिसरी घटना आहे.
हरजीत कौर (22) असे महिलेचे नाव असून ती दिवा येथील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना सुरु होत असल्याने कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसह ती जात होती. लोकल प्रवासात वेदना जास्त होऊ लागल्याने तिला तातडीने ठाणे रेल्वे स्थानकावरील क्लिनिकमध्ये नातेवाईक, प्रवासी , रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने नेण्यात आले. हरजीतने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 9 महीने पूर्ण झाल्यामुळे महिलेची नॉर्मल प्रसूती झाल्याची माहिती क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी दिली.या वर्षभरातील ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील ही तिसरी घटना आहे. याआधी कळवा आणि दिवा रेल्वे स्थानकात प्रसूतीच्या घटना घडल्या आहेत.