स्त्रीने स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:19+5:302021-03-09T04:43:19+5:30
भिवंडी : स्त्रीने स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध केले पाहिजे. एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या स्त्रीने इतर कोणावरही अवलंबून न राहता जागतिक ...
भिवंडी : स्त्रीने स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध केले पाहिजे. एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या स्त्रीने इतर कोणावरही अवलंबून न राहता जागतिक महिला दिन साजरा करताना आपण सबळ झालो आहोत हे दाखवून तो रोजच साजरा करावा, असे वक्तव्य भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील यांनी सोमवारी ‘तिचं अस्तित्व’ या लघुचित्रपटाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केले.
भिवंडी पंचायत समिती सभापती दालनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, सदस्य गुरुनाथ जाधव, भानुदास पाटील, यशवंत भोईर, गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, संजय थोरात, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे, प्रिया पाटील, संघटनेचे नेते महेंद्र पाटील, धीरज भोईर, नंदू नाईक, ज्योती धुमाळ आदी मान्यवर उपस्थितीत होते.
‘तिचं अस्तित्व’ या लघुपटाचे लेखन- दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळा राहनाळचे शिक्षक अजय लिंबाजी पाटील यांनी केले असून छायाचित्रण साईश गोठिवरेकर, एडिटिंग वल्लभ केणे. या लघुपटात कलाकार म्हणून हर्षा बडगुजर, शारदा चौधरी, अजिता पाटील, अजय पाटील, बालकलाकार आदित्य सोनार, नीशा चव्हाण आणि अंजली निकम यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
या लघुपटात महिला स्वतःचं अस्तित्व नाकारत असताना एक लहान मुलगी मात्र स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून महिला सक्षमीकरणाचे महत्त्व इतरांना पटवून देते, असा संदेश दिला असल्याची माहिती लघुपटाचे लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवींद्र तरे यांनी केले असून सकारात्मक संदेश देणारा हा लघुपट लक्ष्मी चित्र या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित केला आहे.
===Photopath===
080321\img-20210308-wa0034.jpg
===Caption===
स्त्रीने स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध करावे - सभापती ललिता पाटील ;
' तिचं अस्तित्व ' शाँर्ट फिल्मच सभापतींच्या हस्ते अनावरण