गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:16+5:302021-06-24T04:27:16+5:30
ठाणे: सिलिंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी ...
ठाणे: सिलिंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी झाल्याची घटना कळवा मनीषानगर येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ती ४० टक्के भाजली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनीषानगर गेट क्रमांक तीन शकुंतला बिल्डिंगमधील तळमजल्यावर राहणारी ही महिला घरात एकटीच होती. त्यावेळी गॅस वाहिनीतील गळतीमुळे अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलासह टोरंट वीज कंपनीचे कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांनी अर्ध्या तासाने ती आग आटोक्यात आणली. या घटनेत कल्पना यांच्या पाठीला आणि दोन्ही हातांना भाजले. त्यांना उपचारासाठी कृष्णाई केअर मेडिक्लिनिक या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील भारत गॅसचे सिलिंडर हे अग्निशमन दलाच्या ताब्यात दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.