महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात; डॉक्टरांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:52 AM2019-02-11T02:52:09+5:302019-02-11T02:52:21+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
जिल्ह्यातील ३४ पीएचसींमध्ये एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांद्वारे रुग्णांना सेवा दिली जाते. पाच पीएचसी बांधायच्या असून त्यासाठी जागा उपलब्ध नाही. गावपाड्यांच्या रुग्णांवरील उपचारासाठी ६७३ डॉक्टरांची पदे भरण्यास मंजुरी आहे. यापैकी ४४५ डॉक्टर भरती केले आहेत. उर्वरित १९२ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे उपचारांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. बहुतांश ठिकाणी रुग्णांवर वेळीच प्राथमिक उपचार होत नसल्यामुळे त्यांना गंभीर आजारास तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
पीएचसीमध्ये सोयी सुविधांचादेखील अभाव आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागली. या गंभीर समस्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष घरत यांनी लावून धरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कल्याणजवळील गोवेली रुग्णालय सोयीसुविधायुक्त करून सुरू करण्याची मागणी आहे. शहापूर परिसरातील शेंद्रुण व वडाचापाडा, सपारपाडा येथील ग्रामस्थांना तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या चार केंद्रांचा निधीदेखील पडून असल्याचे कल्याणचे सभापती सांगतात.
नवघर, पडघा येथे लाखो रुपये खर्चून आरोग्य केंद्रे बांधली आहेत. पण, डॉक्टर नसल्यामुळे या इमारती वापराविना पडून असल्याचे जि.प. सदस्य कुंदन पाटील यांनी उघड केले. २७ गावे परिसरांसाठी नेवाळी पीएचसी उपयुक्त आहे. पण, ते सध्या नवी मुंबई महापालिकेकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले नाही.
जागा विकत
घेण्याची हवी तरतूद
जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. पण, बहुतांश आरोग्य केंद्रे जागेअभावी उभी राहत नसल्याचे दिसून आले. या आरोग्य केंद्रांसाठी सधन व्यक्तीने त्याची जागा दान करण्याची शासनाची अपेक्षा आहे. पण, जागेच्या किमती पाहता आता कोणीही जागा देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आरोग्य केंद्रांचा निधी पडून आहे. यावर मात करण्यासाठी जागा विकत घेण्याची परवानगी शासनाकडून मिळवण्याचा सल्ला मुरबाडचे सदस्य बांगर यांनी दिला.
७५ टक्के एमबीबीएस डॉक्टरांची गरज
डॉक्टरांसह विविध सोयीसुविधांअभावी कुंदे येथील पीएचसी बंद आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर परिपूर्ण उपचार व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये ७५ टक्के एमबीबीएस डॉक्टर व २५ टक्के बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करण्याचा नियम आहे. पण, डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चर्चेत आहे.