नाशिकची विवाहिता मिळाली ठाण्यात, नौपाडा पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:46 PM2018-08-13T22:46:14+5:302018-08-13T22:59:22+5:30
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून अचानक बेपत्ता झालेली महिला ठाण्यात मिळाली. तिला नौपाडा पोलिसांनी शनिवारी पालकांच्या स्वाधीन केले.
ठाणे : नाशिक येथून ठाण्यात आलेली एक मानसिक विकलांग असलेली उषा रवी कांबळे (१९) ही विवाहिता ठाण्यात पोलिसांना संशयास्पदरीत्या मिळाली. नौपाडा पोलिसांनी विश्वासात घेऊन तिची माहिती काढून गंगापूर (नाशिक) पोलीस आणि तिच्या आईच्या ताब्यात शनिवारी तिला दिले. आपल्या आईची भेट घडवून आणल्याबद्दल तिने पोलिसांप्रति समाधान व्यक्त केले.
आपले नाव उषा रमेश कांबळे असे सांगणारी ही विवाहिता ठाण्याच्या नौपाडा परिसरात फिरताना पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली होती. अवघे २० रुपये जवळ असलेल्या या महिलेला सुरुवातीला स्वत:चे नावही आधी सांगता येत नव्हते. नंतर, तिने स्वत:चे माहेरचे वरील संपूर्ण नाव आणि पतीचे नाव रमेश असल्याचे सांगितले. बरीच चौकशी केल्यानंतर तिने साठेनगर येथे चुलते वास्तव्याला असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कपिले यांनी शनिवारी पहाटेपर्यंत ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील साठेनगर भागात चौकशी केली. कुठेही तिचे नातेवाईक आढळले नाही. शनिवारी मात्र तिने आपण नाशिकहून भोसला मिलिटरी स्कूल, संत कबीरनगर परिसरातून आल्याचे सांगितले. हा परिसर गंगापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याची माहिती असल्यामुळे कपिले यांनी या पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तिथे गेल्या दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, गंगापूर पोलीस ठाण्याचे जमादार देशमुख यांच्या मदतीने तिची आई कांताबाई आठवणी यांना पाचारण करून नौपाडा पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
............................