पहाटेपर्यंत चालणाऱ्या बार-डिस्को पबमध्ये महिलेचा विनयभंग आणि मारहाण
By धीरज परब | Published: May 11, 2024 01:24 PM2024-05-11T13:24:00+5:302024-05-11T13:24:15+5:30
नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले
मीरारोड - काशीमीरा भागातील काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत पहाटे पर्यंत चालणाऱ्या बार - डिस्को पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची घटना घडली असून काशिगाव पोलीस ठाण्यात बारचा बाउन्सर आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिगाव येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गवर गेट सेट टुनाईट अर्थात जीएसटी ह्या नावाने डिस्को पब - ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बार मध्ये नियमित ऑर्केस्ट्रा , डान्स चालतो आणि हा बार पहाटे पर्यंत चालू असतो.
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर राहणाऱ्या मेकअप आर्टिस्ट श्वेता ओमप्रकाश सिंग ( २७ ) यांचा वाढदिवस असल्याने त्या मित्रासह जीएसटी पब बार मध्ये गेल्या होत्या . नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले . तसेच शब्बीर नावाच्या बाउन्सर ने सिंग यांना मागून येऊन पकडत विनयभंग केला . ७ मे रोजीच्या पहाटे दिड ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला .
श्वेता सिंग यांच्या फिर्यादी नंतर ८ मे रोजी काशिगाव पोलिसांनी नैना ठाकूर व बार चा बाउन्सर शब्बीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पालवे तपास करत आहेत . अक्षय जैन हा पब - बार चा चालक असल्याचे सांगितले जाते.
येथे हुक्का दिला जात असल्याचे तसेच पोलीस यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि सदर पब बार चे बांधकाम अधिकृत का अनधिकृत ? ह्यावर पालिका देखील चूप असल्याचे आरोप केले जातात . पहाटे पर्यंत चालणारे हे बार - पब शहरातील सामाजिक वातावरण बिघडवण्यासह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत . ह्या आधी मीरारोडच्या कनकीया भागातील बार - पब मध्ये गुन्ह्याच्या घटना घडल्या असून त्यातही रहिवाशी सुद्धा त्रासले गेल्याचे प्रकार घडले होते .