महिला पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:55 AM2019-04-17T05:55:07+5:302019-04-17T05:55:16+5:30
पोलीस अधिकारी शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणा-या बायजाबाई बागुल (३७) या रिक्षाचालक महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या आवारात महिला पोलीस अधिकारी शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणा-या बायजाबाई बागुल (३७) या रिक्षाचालक महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिच्या मुलीने परस्पर विवाह केल्याचे पोलिसांकडून समजल्यानंतर संतापाच्या भरात तिने देशमुख यांच्यासह इतरही महिला पोलिसांवर हल्ला केला. तसेच उपनिरीक्षक पवार यांनाही शिवीगाळ केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागुल यांची २२ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी १० एप्रिल रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या आधारे १२ एप्रिल रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने तिला अहमदनगर (पारनेर) येथून आणले. चौकशीमध्ये आधी बायजाबाई यांच्या संमतीनेच या मुलीचा साखरपुडा झाला होता. मुलगा बागुल कुटुंबीयांच्या घराशेजारीच वास्तव्याला होता. पण, त्याला नोकरी नसल्याने मुलीच्या आईने या लग्नाला विरोध केला. मुलीला मुलगा पसंत असल्यामुळे तिने काही साक्षीदारांच्या मदतीने ९ एप्रिल रोजी ठाण्यातून पळून जाऊन आळंदीला त्या मुलासोबत १० एप्रिल रोजी लग्न केले. दरम्यान, मुलगी बेपत्ता असून तिचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, असे सांगून कापूरबावडी पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी बायजाबाई यांनी चांगलाच गोंधळ घातला. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला तिच्या पतीसह १३ एप्रिल रोजी ठाण्यात आणले. मुलगी सज्ञान (१८ वर्षांवरील) असल्याने पोलिसांनी तिच्या लग्नाबद्दल विचारपूस केली. तेव्हा तिने रीतसर लग्न केल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिल्याचेही सांगितले. हीच बाब पोलिसांनी तिची आई बायजाबाई यांना सांगितले. मुलीने लग्न केल्याचे न रुचल्याने बायजाबाई यांनी आक्रमक पवित्रा घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारातच दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंधळ घातला.
>धमकीही दिली!
महिला पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळही केली. तसेच उपनिरीक्षक पवार यांच्यासह अन्यही दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता जावई आणि मुलीचे तुकडेतुकडे करून टाकीन आणि स्वत:ही आत्महत्या करून सर्वांना अडकवेन, अशी धमकी दिली. मुलीचा पती आणि त्याची बहीण यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली. प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांनी अखेर याप्रकरणी बायजाबाई बागुल यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, महिला पोलीस अधिकाºयावर धावून जाणे, मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली.