ठाण्यातील प्रामाणिक रिक्षा चालकामुळे महिलेला पुन्हा मिळाला लॅपटॉप
By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2019 10:29 PM2019-10-14T22:29:10+5:302019-10-14T22:33:01+5:30
एकीकडे मुजोर आणि बेशिस्तीमुळे अनेक रिक्षाचालक बदनाम होत असताना ठाण्यातील चेतन थोरात या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेला लॅपटॉप दिवा येथील महिलेला सुखरुप परत मिळाला. कासारवडवली पोलिसांनी तो साधना फराक्टे या महिलेला सोमवारी परत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रामाणिक रिक्षा चालकामुळे दिवा येथील रहिवाशी असलेल्या साधना महेश फराक्टे महिलेला तिचा ८० हजारांचा लॅपटॉप पुन्हा सुखरुपपणे परत मिळाला. चेतन थोरात या चालकाने आपल्या रिक्षात विसरलेला लॅपटॉप कासारवडवली पोलिसांकडे दिल्यानंतर त्यांनी तो या महिलेकडे सोमवारी अवघ्या दोन तासांतच सुपूर्द केला.
फराक्टे या १४ आॅक्टोंबर रोजी आपल्या काही कामानिमित्त ठाणे स्थानक येथून रिक्षाने कासारवडवली येथील एनबीसी पार्क येथे एका रिक्षाने सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास जात होत्या. या रिक्षातून त्या उतरल्यानंतर त्यांचा लॅपटॉप मात्र त्या रिक्षातच विसरुन निघून गेल्या. काही अंतर गेल्यानंतर चालक थोरात यांना रिक्षात प्रवासी महिलेकडून विसरलेला हा लॅपटॉप मिळाला. त्यांनी तो तातडीने कासारवडवली पोलीस ठाण्यात आणून दिला. या लॅपटॉपच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने संबंधित महिला साधना फराक्टे यांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन त्यांच्याकडे तो दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सुपूर्द केला. आपल्याकडून गहाळ झालेल्या लॅपटॉपबाबत कोणतीही तक्रार किंवा गुन्हाही दाखल न करता तो प्रामाणिक रिक्षा चालकाच्या मदतीने पोलिसांनी मिळवून दिल्याबद्दल साधना यांनी पोलिसांची आभार मानले.