VIDEO - कल्याणमध्ये केडीएमसीच्या कारवाईच्या विरोधात महिलेचा जाळून घेण्याचा प्रयत्न, उपचारासाठी खासगी रुग्णालयात केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:08 PM2017-10-07T15:08:51+5:302017-10-07T15:23:25+5:30
कल्याण शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणा-या एका नागरीकाने शौचालयाच्या जागेवर घर बांधल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी दिली होती.
कल्याण - कल्याण शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणा-या एका नागरीकाने शौचालयाच्या जागेवर घर बांधल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी दिली होती. या तक्रारीच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करण्यासाठी गेले असता घरातील बेबीनाल सय्यद या महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही महिला कासीब सय्यद यांची पत्नी असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. कासीब सय्यद व त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कासीब सय्यद हे कचोरे गावातील श्रीकृष्णनगरात गेल्या अनेक वर्षापासून राहतात. त्यांच्याकडे ग्रामपंचायत असल्यापासूनची मालमत्ता कराची कर पावती आहे. त्याच्या जागेवर त्यांनी घर बांधण्याचे काम हाती घेतले. त्याचवेळी त्याच परिसरातील एकाने घर बांधण्याचे काम हाती घेतले. कासीब यांनी घर बांधण्याचे काम शिवसेनेशी संबंधित असलेल्या कंत्राटदाराला दिले. ते काम अन्य एकाने त्यांच्या घराचे काम भाजपशी संबंधित असलेल्या कंत्राटदाराला दिले. त्याठिकाणी कारवाईसाठी महापालिकेचे पथक पोहचले होते. मात्र समझोता होऊन कारवाईच झाली नाही. त्यानंतर सय्यद हे नव्या घरात राहण्यासाठी पोहचले.
त्यांच्या विरोधात स्थानिक नगरसेविका चौधरी यांची तक्रार होती. सय्यद यांनी शौचालयाच्या जागेवर घर बांधले असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करा. महापालिकेचे कारवाई पथक आज पोलिस बंदोबस्तात गेले असता सय्यद यांनी त्याला विरोध केला. आधी समझोता केला. त्यानंतर कारवाईसाठी का आले. आधीच कारवाई करायची होती. बांधलेले घर तोडणार यासाठी बेबीनाल यांनी घराचे दार बंद करुन अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर खिडकीतून पेटविलेला पलिदा दाखवून स्वत: ला पेटवून घेण्याचा इशारा दिला. या घटनेमुळे कारवाईसाठी गेलेल्या महापालिका पथकासह पोलिसांना माघारी हात फिरावे लागले.
परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ माजली. सय्यद यांना उच्च रक्तदाब व मधूमेहाचा आजार असल्याने त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. उपचार घेत असलेल्या बेबीनाल व कासीब सय्यद यांच्या जाबजबाब घेतल्यानंतर पुढील पोलीस कारवाई केली जाईल.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन संघनटेचे उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांनी सांगितले की, नगरसेविका चौधरी यांना कासीबच्या घराचे बांधकामाचे कंत्राट हवे होते. त्यांनी कासीबकडे पैशाची मागणी केली होती. त्यामुळेच हा प्रकार घडला. चौधरी यांचे नगरसेविका पद रद्द कर करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात नगरसेविका चौधरीय यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कासीबने घर बांधण्यापूर्वी ती जागा मोकळी होती. त्याठिकाणच्या नागरीकांनी त्यांना शौचालय बांधून हवे अशी मागमी केली होती. नागरीकांच्या मागणीनुसार शौचालय बांधण्याची मागणी केली होती. माझी तक्रार कासीबच्या विरोधात नव्हती तसेच पैसे मागितल्याचा व त्याचा घर बांधण्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. त्याने व त्याला समर्थन देणा-या संघटनांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि निराधार आहेत.