महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट, ठाण्यात अटक
By जितेंद्र कालेकर | Published: April 4, 2024 09:13 PM2024-04-04T21:13:48+5:302024-04-04T21:14:06+5:30
गुन्हे शाखेची कारवाई: दोन पीडित तरुणींची सुटका
ठाणे : घाेडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलसमोरील सेवा रस्त्यावर शरीर विक्रयसाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सुटका केली आहे. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलाल महिलेला याप्रकरणी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोड, सिनेवंडर मॉलसमोरील सर्विस रोडवर एक महिला दोन तरुणींना शरीर विक्रयच्या व्यवसायासाठी घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे २ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या पथकाने बनावट गिऱ्हाइकांच्या मदतीने सापळा लावला. याच सापळ्यात एका दलाल महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या महिलेविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणींना सुरक्षिततेच्या दृष्टीने चितळसर मानपाडा येथील एका सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.