महिलेचे तीन लाख दुचाकीस्वारांनी लांबवले, साडीवर घाण पडल्याची बतावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:30 AM2019-08-01T01:30:00+5:302019-08-01T01:30:07+5:30
डोंबिवलीतील घटना : साडीवर घाण पडल्याची बतावणी, गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकास फटका
डोंबिवली : साडीवर घाण पडल्याची बतावणी करत ४४ वर्षांच्या महिलेकडील दोन लाख ९० हजार रुपयांची रोकड दोघा चोरट्यांनी लांबवल्याची घटना सोमवारी पश्चिमेत घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पश्चिमेतील एका गॅस एजन्सीमध्ये पद्मजा परब (रा. कैलासनगर) या व्यवस्थापक म्हणून काम करतात. या एजन्सीमध्ये जमा झालेले पैसे बँकेत भरण्यासाठी पद्मजा आपल्या सहकाऱ्यासह जात होत्या. यावेळी पावसामुळे कपडे ओले झाल्याने ते बदलण्यासाठी पद्मजा घरी जात होत्या. त्या आपल्या इमारतीच्या आवारात पोहोचल्या असता एक २० ते २५ वर्षांचा तरुण त्यांच्याजवळ आला. साडीच्या पदरावर घाण पडल्याचे त्याने पद्मजा यांना सांगितले. यावेळी पद्मजा यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दोन लाख ९० हजार रुपये असलेली पिशवी त्याने स्वत:जवळ ठेवली. पद्मजा या पदरावरील घाण साफ करत असल्याचे पाहून रोकड असलेली पिशवी घेऊन त्या चोरट्याने जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी पद्मजा यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.