खुनी हल्ला झालेल्या ‘त्या’ महिलेची प्रकृती चिंताजनकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:02 PM2018-11-13T22:02:34+5:302018-11-13T22:10:46+5:30
सोमवारी ठाण्याच्या खोपट भागात एका ४२ वर्षीय विवाहित सुरक्षारक्षक महिलेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला होता. तिच्यावर शस्त्रक्रीया पार पडली असून प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोमवारी खोपट भागात एकतर्फी प्रेमातून खुनी हल्ला झालेल्या ‘त्या’ ४२ वर्षीय सुरक्षारक्षक महिलेवर मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. प्रकृती गंभीर असली तरी आता धोक्याबाहेर असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी विकास धनवडे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही महिला आणि आरोपी विकास यांच्यामध्ये गुेल्या तीन ते चार वर्षांपासून मैत्री आहे. तो अविवाहित असून ती विवाहित आहे. तिला १९ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. पतीबरोबर पटत नसल्यामुळे ते एकत्र राहत नाही. खासगी सुरक्षारक्षक विकास बरोबर तिची ओळख झाल्यानंतर तिने त्याला लग्नासाठी होकार दिला होता, असा दावा त्याने केला आहे. चांगली मैत्री असल्यामुळेच त्याने तिला कधी तीन हजार तर कधी पाच हजार रुपये असे ५५ हजार रुपये दिले. याच पैशातून ती सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार होती. नोकरी नाही पण निदान ती आपल्याबरोबर लग्न तरी करील, अशी त्याला अपेक्षा होती. तिने टाळल्यामुळे भ्रमनिरास झाल्याने रागातूनच टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याने पोलीस चौकशीत केला.
* जखमा खोलवर
तिच्यावर चाकूने वार झालेल्या जखमा खोलवर आहेत. तिच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात असून तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालय सूत्रांचा हवाला देऊन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.
* महिला आयोगानेही केली चौकशी
दरम्यान, राज्य महिला आयोगानेही या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन नौपाडा पोलिसांकडे या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.