भरधाव टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:46 AM2017-07-27T00:46:45+5:302017-07-27T00:46:47+5:30
भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडून उल्हासनगरच्या पवई चौकात बुधवारी सकाळी महिलेचा चिरडून मुत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी टँकरचालक गोविंद गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे
उल्हासनगर : भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडून उल्हासनगरच्या पवई चौकात बुधवारी सकाळी महिलेचा चिरडून मुत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी टँकरचालक गोविंद गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भरधाव वेग आणि खड्डयांमुळे महिलेचा बळी गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
उल्हासनगरच्या कॅम्प नं. तीनच्या पवई चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. तेथून सकाळी साडेदहाच्या दरम्यान पाण्याचा टँकर भरधाव जात होता. त्याचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या जया झरेकर (वय ३४) यांच्या तो अंगावरून गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या कल्याणच्या खडेगोळवली येथे राहणाºया आहेत. टँकरचालक गोविंद पळण्याच्या तयारीत होता. रहिवाशांनी त्याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. भरधाव वेग आणि रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात त्याच्याकडून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खड्ड्यांचा विषय गाजत असल्याने आणि त्यातून दुर्घटना घडत असल्याने पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहाड फाटकाच्या रस्त्यासह इतर रस्त्यांची पाहणी पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले. हे खड्डे स्वातंत्र्य दिनापूर्वी न भरल्यास रिक्षा संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्या दरम्यानच ही दुर्घटना घडली. त्यामुळे खड्डे बुजवण्याचा विषयही तापला आहे.