रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधनामुळे वाचले महिलेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:10 PM2020-12-13T17:10:50+5:302020-12-13T17:14:23+5:30
उपनगरी रेल्वेमध्ये चढताना नाजिया सहजाद शेख (४५) ही महिला पाय घसरुन खाली पडत असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) पोलीस कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या उपनगरी रेल्वेमध्ये चढताना नाजिया सहजाद शेख (४५) ही महिला पाय घसरुन खाली पडत असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) पोलीस कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. महिला प्रवाशाचे प्राण वाचविणाºया या पोलीस शिपायाचे रेल्वे वर्तुळात कौतुक होत आहे.
मुंब्रा येथील किस्मत कॉलनी येथे राहणारी नाजिया ही मुंब्रा येथून मुंबईला जाण्यासाठी उपनगरी रेल्वेने जाण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोन येथून १२ डिसेंबर रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास चढली. चढतांना तिने आधी तिची नऊ वर्षीय मुलगी आत शिरली. नंतर ती चढत असतांनाच रेल्वे फलाटावरुन सुटली. त्यामुळे तिचा पाय सटकला. यात तोल गेल्यामुळे ती रेल्वेमधून खाली पडत असल्याची बाब त्याच स्थानकावर नेमणूकीस असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, त्या महिलेला त्यांनी पुन्हा रेल्वेमध्ये ढकलत तिचे प्राण वाचविले. अशा घटनांमध्ये प्रवाशाला बाहेर ओढले जाते, पण या घटनेमध्ये या महिलेला बाहेर ओढले असते तर तिच्यासह वाघ यांच्याही जीवाला धोका पोहचला असता. त्यामुळेच त्यांनी तिला आत ढकलून समयसूचकता दाखविल्याचे मुंब्रा आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, वाघ यांनी सतर्कता आणि समयसुचकता दाखवून या महिलेचे प्राण वाचविल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलासह प्रवाशांनीही त्यांचे कौतुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ही महिला तिच्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत होती. मुलगी रेल्वेत शिरली. पण ही महिला रेल्वेत चढतांना रेल्वे सुटली आणि तिचा पाय सटकला. हीच बाब लक्षात आल्याने वाघ यांनी तातडीने तिला आत ढकलले. नंतर ते पुन्हा खाली उतरले. नंतर रेल्वे कळव्यात शिरल्यानंतर कळवा येथील आरपीएफ जवानाने ती सुखरुप असल्याची खातरजमा केली. वाघ यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.’’
अमितकुमार यादव, पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, मुंब्रा