मतदान करण्यातही महिला पिछाडीवरच
By admin | Published: February 23, 2017 06:06 AM2017-02-23T06:06:03+5:302017-02-23T06:06:03+5:30
ठाणे महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत एक महिला जास्तीची निवडून जाणार आहे. शिवाय, यंदाचे
ठाणे : ठाणे महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत एक महिला जास्तीची निवडून जाणार आहे. शिवाय, यंदाचे महापौरपद महिलेसाठी राखीव झाले असल्याने ठाणे महापालिकेच्या सत्तेवर महिलाराज येणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापालिकेतदेखील सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना समान संधी दिली. असे असले तरी मतदान करण्यात मात्र महिला आजही पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महापालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानामध्ये पुरु षांच्या तुलनेत ६६ हजारांपेक्षा कमी मतदान महिला मतदारांचे झाले आहे. मात्र, दुसरीकडे महिला मतदानाचा टक्का निवडणुकीमध्ये वाढला नसल्याने मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का वाढायला हवा, अशी अपेक्षा महिलांनीच व्यक्त केली आहे.
या निवडणुकीमध्ये ३५९ महिला रिंगणामध्ये आहेत. महिलांना उमेदवारी देण्यामध्ये भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्र मांक ३, १२, १५, २९ आणि ३३ या प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. यामध्ये काही विद्यमान नगरसेविकांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या वतीने ११९ जागांवर उमेदवार उभे केले असून यामध्ये तब्बल ६७ महिला उमेदवार आहेत, तर ५३ पुरु ष उमेदवार आहेत. काही पुरुष प्रभागांमध्येही महिलांना संधी दिली आहे. भाजप १२० जागांवर निवडणूक लढत असून त्यांनी ६३ जागांवर महिला उमेदवार दिले आहेत. मनसे देखील महिलांना उमेदवारी देण्यात पिछाडीवर नसून त्यांनी १११ जागांपैकी ५४ जागी त्यांना संधी दिली आहे, तर ५७ जागी पुरु ष उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी ८७ जागी निवडणूक लढवत असून त्यांनी ४५ जागी पुरु ष, तर ४२ महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या ६० पैकी २८ महिला उमेदवार आहेत. मतदान नोंदणीतही पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमीच आहे. (प्रतिनिधी)