चिमुकलीच्या गळ्यातील सोने खेचून पळणाऱ्या महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:26 AM2020-03-06T01:26:04+5:302020-03-06T01:26:07+5:30
दोन महिलांना पाठलाग करून काही दक्ष नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : कळवा येथील वैष्णवी बाबर या एकवर्षीय मुलीच्या गळ्यातील सोन्याचे ताबीज खेचून पळ काढणाºया अंजली काळे (२७) आणि बाली काळे (१९, रा. उस्मानाबाद) या दोन महिलांना पाठलाग करून काही दक्ष नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कळवा येथील घोलाईनगरच्या रहिवासी माला बाबर या ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता सासू सुनीता, सासरे सुरेश तसेच मुलगी वैष्णवी हिच्यासह घोलाईनगरच्या आठवडाबाजारामध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदी करण्यात ही सर्व मंडळी गर्क असताना वैष्णवी तिच्या आजीसमवेत होती. त्यावेळी तिघेजण अपर्णा अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर आले. तेव्हा त्यांच्यामागून दोन अनोळखी महिला आल्या. त्यातील एकीने सुनीता यांना धक्का मारला. तर, दुसरीने वैष्णवीच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सुमारे साडेतीन हजारांचे सोन्याचे ताबीज खेचून तिथून पळण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर सुनीता बाबर यांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजारातील काही लोकांनी प्रसंगावधान राखून अंजली आणि बाली या दोन्ही महिलांना पकडले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून अंजली हिच्याकडील सोन्याचे ताबीजही पोलिसांनी हस्तगत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर याप्रकरणाचा तपास करीत आहेत.