महिला सहायक आयुक्तांनी रिक्षाचालकांचा उतरवला माज; कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:53 AM2020-10-17T00:53:01+5:302020-10-17T00:53:28+5:30
गुन्हा दाखल करण्याचा दिला इशारा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने बाहेरून येणा:या प्रवाशांची ठाणे रेल्वेस्थानक परिसरात ॲण्टीजेन टेस्ट करण्यात येत असून या कामात अडथळा आणणाऱ्या तसेच पालिकेच्या महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन करणारे मुजोर रिक्षाचालकांचा माज गुरुवारी नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी उतरवला आहे.
गुरुवारीही काही रिक्षाचालक कामात अडथळा आणत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्या जाब विचारण्यासाठी थेट ठाणे स्थानक परिसरात गेल्या. मात्र, त्यांनाही अरेरावीची भाषा केल्यानंतर संतापलेल्या घोंगे यांनी एका रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लावली. त्यानंतर, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून हा वाद मिटवला असला, तरी अशाच प्रकारे जर रिक्षाचालकांची अरेरावी सुरू राहिली, तर ठाणे महापालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ठाणे स्थानक परिसरात ॲॅण्टीजेन टेस्टचे काम सुरू असून खाली गर्दी होत असल्याने ही टेस्ट आता सॅटिसवर करण्यात येते. मात्र, अशा महत्त्वाच्या कामात काही रिक्षाचालक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. तसेच महिला कर्मचारी यांनादेखील त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी आल्यानंतर रिक्षाचालकांना समज दिली होती. मात्र, एका रिक्षाचालकाने मलाच अरेरावीची भाषा केली. यासंदर्भात वेळ पडल्यास गुन्हादेखील दाखल करण्यात येईल. - प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त, नौपाडा प्रभाग समिती, ठामपा