महिला कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण : अखेर एसीपी निपुंगेंचा अटकपूर्व जामीनही ठाणे न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:27 PM2017-09-25T22:27:27+5:302017-09-25T22:27:50+5:30
ठाणे, दि. २५ - महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीनअर्ज सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा मार्गही मोकळा झाला आहे.
पवार आत्महत्या प्रकरणात एसीपींविरुद्ध परिस्थितीजन्य तसेच प्रथमदर्शनी पुरावे आहेत. तिला त्यांनी जवळपास १११ कॉल्स केल्याचेही सीडीआर रेकॉर्ड मिळाले आहे. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली, त्या दिवशीही त्यांनी तिला वारंवार फोन केले. जुलै २०१७ पासून ते तिचा मानसिक छळ करत होते. याबाबत, तिने वाग्दत्त पतीलाही माहिती दिली. याच माहितीच्या आधारावर तिच्या भावाने कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत एसीपी निपुेंगेचे नाव घेतले आहे. कॉन्स्टेबलनंतर अनेक अधिकारी असतानाही थेट एसीपींनी तिला वारंवार संपर्क करण्याचे कारण स्पष्ट होत नाही. याशिवाय, तिने गळफास घेतला, त्या वेळी ते तिच्या घराजवळच होते. अशा अनेक बाबी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी निदर्शनास आणून दिल्या. या संपूर्ण चौकशीसाठी त्यांची पोलीस कोठडी गरजेची असून त्यांचा मोबाइलही जप्त करण्याची परवानगी मागितली. त्यावर, निपुंगे यांचा या आत्महत्येशी संबंध नाही. पण, चौकशीसाठी ते पोलिसांना संपूर्णपणे चौकशी करतील. त्यामुळे कोठडीऐवजी त्यांना रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात यावी. तसेच त्यांचा मोबाइलही ते द्यायला तयार आहेत. परंतु, त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी बाजू आरोपीच्या वतीने अॅड. धोत्रे यांनी न्यायालयापुढे मांडली. उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर सोमवारी न्यायालयाने निपुंगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
काय होऊ शकते...
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला होता. आता अटकपूर्व जामीन अर्जही उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर फेटाळला. यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागावी लागेल. त्या काळात पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.