महिलांकडून अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:49 AM2017-08-03T01:49:53+5:302017-08-03T01:49:53+5:30
पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सहन करणाºया नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर या ग्रामीण भागांत पाहणी दौरा करण्याकरिता बुधवारी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यांना महिलांनी अक्षरश: धारेवर धरले.
डोंबिवली : पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सहन करणाºया नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर या ग्रामीण भागांत पाहणी दौरा करण्याकरिता बुधवारी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यांना महिलांनी अक्षरश: धारेवर धरले. आम्हाला पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, महापालिकेची क्षमता नव्हती तर आमची गावे हद्दीत घेतलीच कशाला, अशी सरबत्ती महिलांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी नांदिवली टेकडी भागातील पाण्याची समस्या जाणण्यासाठी पाहणी दौरा केला. त्या वेळी महिलांच्या संतापाचा प्रत्यय त्यांना आला. आमच्या परिसरातील प्रत्यक्ष स्थितीचा अहवाल वरिष्ठांना का देत नाहीत, असा सवालही महिलांनी केला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन सपशेल कोलमडलेले असून या विभागात कार्यरत असलेले कर्मचारी दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. एमआयडीसीचे अधिकारी सांगतात की, त्यांनी पूर्ण दाबाने पाणी सोडले आहे. मग, पाणी नेमके जाते कुठे? कोणाचे काही साटेलोटे असेल, तर असू द्या, पण आम्हाला न्याय हवाय. पाणी हा मूलभूत अधिकार असून गावे महापालिकेत सामावून घेताना पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला नव्हता का, असे महिलांनी विचारले.
अधिकाºयांनी नांदिवली टेकडी परिसरातील व्हॉल्व्हची पाहणी केली, तसेच कुठे नेमके पाणी अडते, त्याची पाहणी करत तसा अहवाल वरिष्ठांकडे देणार असल्याचे सांगितले. त्रस्त नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन सुप्रिया कुलकर्णी या महिलेने केले. शहरात अन्यत्र कुठेही पाण्याची समस्या नसताना आम्हाला का टंचाई भेडसावत आहे, असा सवाल कुलकर्णी यांनी केला.