महिलांनी माझ्यासारखे कपडे घातले नाही तरी चांगल्या दिसतात; योगशिबिरात रामदेव बाबांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 08:25 AM2022-11-26T08:25:52+5:302022-11-26T08:27:20+5:30
अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सकाळी पाच वाजता आयोजन केले होते.
ठाणे: महिलांनी साडी, सलवार सूट परिधान केल्यावर त्या सुंदर चांगल्या दिसतात, तसेच माझ्यासारखे त्यांनी कपडे परिधान केले नाही तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी ठाण्यात महिलांच्या योगशिबिरात केले. यावेळी रामदेव यांच्यासमवेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.
अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सकाळी पाच वाजता आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांच्यासह दीपाली सय्यद, आमदार रवी राणा आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी महिलांना संबोधित करताना, रामदेवबाबांनी उपरोक्त वादग्रस्त विधान केले. अमृत फडणवीस यांच्याकडे तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षांपर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, त्या नेहमीच तोलून-मापून खातात.
त्या आनंदी राहतात, त्यांच्याकडे पाहाल तर त्या नेहमी लहान मुलांप्रमाणे हसतमुख राहतात, असेही ते म्हणाले. रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांना त्यांचा हसरा चेहरा आपल्याकडे करण्याची विनंती केली व त्यानंतर वरील वादग्रस्त वक्तव्य केले.
भारताकडे योगशक्ती
लहान मुलांना कोण कपडे घालतो, ते आठ ते १० वर्षांचे होईपर्यंत उघडेच फिरत असतात, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. भारताकडे योगशक्ती असून ती महान आहे. भारताला महान शक्ती बनविण्यासाठी आंदोलन, महायज्ञ अभियान राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.