पाण्याच्या भांडणातून महिलांमध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:06 AM2018-12-25T03:06:33+5:302018-12-25T03:07:09+5:30
ठाण्यात पाणीटंचाईचा दाह वाढत असून, यातूनच महिलांच्या दोन गटांत चक्क हाणामारी झाली. एकमेकींवर दगडाने हल्ला केल्याने दोघीजणी गंभीर जखमी झाल्या.
ठाणे : ठाण्यात पाणीटंचाईचा दाह वाढत असून, यातूनच महिलांच्या दोन गटांत चक्क हाणामारी झाली. एकमेकींवर दगडाने हल्ला केल्याने दोघीजणी गंभीर जखमी झाल्या. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी शनिवारी तक्रारी दिल्या.
बाळकूमपाड्यातील संगीता जोशी २२ डिसेंबर रोजी न्यू महालक्ष्मीनगर पाइपलाइनजवळील त्यांच्या घराबाहेरील नळावर कपडे धुत होत्या. त्यांच्या शेजारी सीमा पठाणे यांनी त्यांना कपडे धुण्यासाठी अटकाव करीत बांबूने मारहाण केली. सीमाच्या भावाने दगडाने डोक्यावर दुखापत केली. याप्रकरणी सीमा पठाणे, राकेश पठाणे आणि सीमाचा भाऊ अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीमा पठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी संगीता जोशी यांच्यासह अन्य दोन महिलांना नळावर कपडे धुण्यास मनाई केल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केली. जोशी यांच्यासोबत असलेल्या एका महिलेने सीमा यांचे केस पकडले. दुसरीने बांबूने मारहाण करून, तर संगीताने शिवीगाळ व मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर, दगडाने सीमा यांच्या पायाला दुखापत केली. याप्रकरणी सीमा यांनी जोशी यांच्यासह अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिला जखमी
कपडे धुण्यावरुन झालेल्या वादाचे हल्ल्यात पर्यवसान झाले. महिलांनी एकेमेकांवर हल्ले चढवले. या घटनेत जखमी झालेल्या संगीत जोशी आणि सीमा पठाणे या दोघींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.