महिलांचा भाजपाला दे धक्का!
By admin | Published: April 9, 2016 02:11 AM2016-04-09T02:11:06+5:302016-04-09T02:11:06+5:30
देशात, राज्यात आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाला कल्याणमधील महिला कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धक्का दिला
कल्याण : देशात, राज्यात आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाला कल्याणमधील महिला कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धक्का दिला. पक्षाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा रश्मी कोलते यांच्या नेतृत्वाखाली ७० महिला कार्यकर्त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपातर्फे प्रयत्न सुरू असतानाच त्या पक्षाला पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा धक्का बसला आहे.
नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आणि कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. कोलते या आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत होत्या. परंतु, नवीन कार्यकारिणीत त्यांची पुन्हा उपाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा होती. त्यांनी तशी मागणीही पक्ष नेतृत्वाकडे केली होती. परंतु, त्यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या कोलते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या वेळी त्यांना कार्यकारिणी सदस्य व महिला आघाडी पदाधिकारी म्हणून काम करणार का, अशी विचारणा केली होती. पण, त्यांनी त्यावेळी नकार दिल्याने इतरांना संधी देण्यात आल्याचे स्पष्टीकरण पक्षातर्फे देण्यात आले. (प्रतिनिधी)