महिलांना सोनोग्राफीचे अनुदान मिळालेच नाही
By admin | Published: November 16, 2015 02:05 AM2015-11-16T02:05:48+5:302015-11-16T02:05:48+5:30
जिल्ह्यातील आठ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करून त्यांना बिल दिल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे
ठाणे : जिल्ह्यातील आठ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करून त्यांना बिल दिल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे. पण, तो संशयास्पद असून मुरबाड व शहापूरमधील एकाही आदिवासी महिलेला याचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार वकील इंदवी तुळपुळे यांनी केला.
या अनुदानाची रक्कम आरोग्य विभागाकडे पडून असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सुमारे चार वर्षांपासून वननिकेतन संस्था व श्रमिक मुक्ती संघटना यांनी शासनाच्या जिल्हास्तरीय बैठकांमधून या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हा नियोजन समितीच्या तीन बैठकांमध्ये हा विषय चर्चेला घेतला. पण, आजपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.