पाण्यासाठी सावरकरनगर, करवालो नगर, लोकमान्यनगरातील महिला आक्रमक, ठामपा मुख्यालयासमोर फोडली मडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:05 PM2022-04-12T15:05:47+5:302022-04-12T15:07:09+5:30
Thane News: गेल्या पाच वर्षांपासून सावरकर नगर, करवालो नगर आणि लोकमान्य नगर परिसराला पाण्याचा अनियमित आणि अपुरा पुरवठा केला जात आहे. त्याचे संतप्त पडसाद आज उमटले.
ठाणे - गेल्या पाच वर्षांपासून सावरकर नगर, करवालो नगर आणि लोकमान्य नगर परिसराला पाण्याचा अनियमित आणि अपुरा पुरवठा केला जात आहे. त्याचे संतप्त पडसाद आज उमटले. येथील महिलांनी मंगळवारी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगरसेवक अमीत सरैय्या, समाजसेवक मयूर शिंदे, संतोष पाटील, माणिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालिका मुख्यालयावर धडक दिली. या मोर्चेकरी महिलांनी यावेळी ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मडकी फोडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, यावेळी मोर्चेकर्यांना सामोरे जात ठामपा अधिकार्यांनी दीड महिन्यात येथील पाणीप्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागामध्ये साधारणपणे 50 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. या भागामध्ये पाण्याचा अनियमित पुरवठा होत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ 2 दशलक्ष लिटर्सची एकच पाण्याची टाकी ठाणे महानगर पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. शिवाय, अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पाणी वितरणाचे जाळेही नव्याने विस्तारण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. कमी क्षमतेची पाण्याची टाकी अन् आताच्या स्थितीमध्ये ती नादुरुस्त असल्याने नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी आपल्या रोजगारावर जाणेही दुरापास्त झालेले आहे. परिणामी, संतप्त झालेल्या सावरकर नगर, करवालो नगर आणि लोकमान्य नगर या भागातील महिला आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘हंडा मोर्चा’ घेऊन ठामपा मुख्यालयासमोर दाखल झाले. या मोर्चात माजी नगरसेवक हणमंत जगदाळेदेखील सहभागी झाले होते.
लोकमान्य नगर बसडेपो पासून रणरणत्या उन्हात मोर्चेकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठामपा मुख्यालय गाठले. मात्र, सुरुवातीस अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण ठामपाच्या सुरक्षा अधिकार्यांनी दिल्यानंतर संतापलेल्या मोर्चेकर्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. अखेर, ठामपाच्या पाणीखात्याचे कार्यकारी अभियंते ढोले यांनी पालिका प्रवेशद्वारावर येऊन मोर्चेकर्यांची भेट घेतली. अभियंते ढोले यांनी, मोर्चेकर्यांच्या वतीने, सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागात पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी; सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर भागातील पाणीपुरवठ्यामध्ये वाढ करावी: सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी आणखी जलकुंभ उभारण्यात यावेत; सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर भागात पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यात यावी; सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर भागासाठी स्वतंत्र जल वितरण यंत्रणा विकसीत करुन वॉटर सप्लायचे रिमॉडेलिंग करावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर ढोले यांनी, ही समस्या निकाली काढण्यासाठी दीड महिन्यात उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या संदर्भात अमीत सरैय्या यांनी सांगितले की, पाणी खात्याचे कार्यकारी अभियंते ढोले यांनी पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करण्यासाठी दीड महिन्यांचा अवधी लागले, असे आश्वासन दिले आहे. मात्र, इतर मागण्यांसाठी वेळ लागणार आहे. त्यास आम्ही सहमती दिली आहे. मात्र, दीड महिन्यानंतर जर हा प्रश्न मार्गी लावला नाही. तर, आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरु अन् त्याची जबाबदारी सर्वस्वी ठामपा प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.