ठाणे जिल्ह्याच्या जांभुर्डे गावातील महिला करणार भाजीपाल्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:21 PM2020-12-20T23:21:27+5:302020-12-20T23:37:15+5:30
मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील ५० महिलांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे या महिला यापुढे गावात भाजीपाल्याची लागवड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील महिलांना भाजीपाला लागवडीचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. तब्बल ५० महिलांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण घेतल्यामुळे या महिला यापुढे गावात भाजीपाल्याची लागवड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक गावात मोठया प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जाते. परंतु, प्रत्येक वेळेस ती शास्त्रीय पद्धतीने होतेच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील महिलांना भाजीपाला लागवडीचे
प्रशिक्षण देण्यात आले. दहा दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत महिला बचत गटातील तब्बल ५० महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या अभ्यासक्र मात आरसेटी मार्फत भाजीपाला लागवड विषयी संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर उद्योग व्यवसाय सुरू करताना लागणारे भांडवल शासकीय योजनेतून कसे मिळवता येते, यासाठी विविध योजना कोणत्या आहे, याचीही माहिती या प्रशिक्षणातून देण्यात आली. तसेच बँकेच्या कर्ज योजना विषयांचे ज्ञान प्रशिक्षण दरम्यान देण्यात आले. यावेळी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक विवेक निमकर, जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), अस्मिता मोहिते, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि म्हसाचे शाखा प्रबंधक योगेश लोहकरे , महाबँक आरसेटीच्या प्रशिक्षक अलका देवरे आदींच्या यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहल खंडागळे, प्रकाश नाईक, अंजना जाधव तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका समन्वयक आणि त्यांचे सहकारी समारोप समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण प्रसंगी उपस्थित होते.