५ हजार च्या शॉपिंग वर गिफ्टच्या आमिषाने १ लाख १३ हजार महिलेने गमावले
By धीरज परब | Published: August 13, 2023 09:04 PM2023-08-13T21:04:51+5:302023-08-13T21:05:16+5:30
आयफोन चे गिफ्ट व्हाउचर आहे , जीएसटीची रक्कम १४ हजार ५०० भरा ती परत मिळेल असे सांगितल्यावर गांधी यांनी ती रक्कम भरली
मीरारोड - ५ हजार रुपयांची खरेदी केल्यास गिफ्ट मिळण्याचे आमिष दाखवत मीरारोडच्या महिलेची १ लाख १३ हजार रुपयांना सायबर लुटारूंनी फसवणूक केल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका बड्या कंपनीत कर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या कृतिका गांधी ह्या मीरारोडच्या पूनम नगर मध्ये राहतात . त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला असता स्वतःचे नाव आयुष शर्मा आणि निशा सिंग सांगणाऱ्या दोघांनी ५ हजारांची शॉपिंग केल्यास भेटवस्तू मिळेल सांगितले . त्यांनी सांगितल्या प्रमाणे गांधी यांनी ५ हजार रुपयांच्या वस्तू निवडल्या आणि ऑनलाईन ५ हजार ७१० रुपये भरले . आयफोन चे गिफ्ट व्हाउचर आहे , जीएसटीची रक्कम १४ हजार ५०० भरा ती परत मिळेल असे सांगितल्यावर गांधी यांनी ती रक्कम भरली . परंतु भरलेल्या रकमेत ४५ पैश्यांचा फरक असल्याने पुन्हा पूर्ण रक्कम भरण्यास सांगितली असता ती देखील गांधी यांनी भरली.
भरलेली रक्कम २९ हजार इतकी असून आणखी ८,१६४ रुपये भरले तर तुम्हाला ४० हजार रूपये पाठवू त्यांनी सांगितले तसे गांधी यांनी ते पैसे सुद्धा भरले . नंतर त्यांना गुगल पे वर जाऊन सुचने प्रमाणे करण्यास सांगितले तसे गांधी यांनी केले असता त्यांच्या खात्यातून आणखी ४० हजार रुपये गेले . पुढे ओटीपी चुकीचा टाकला असे सांगून गेलेले पैसे परत मिळण्यासाठी दोन खात्यात प्रत्येकी १५ हजार भरा सांगितले असता ती रक्कम गांधी यांनी भरली . त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचा बनावट स्क्रीन शॉट व इलेक्ट्रिक संदेश पाठवून पैसे मिळण्याची वाट पहा असे सांगितले . परंतु पैसे काही न आल्याने गांधी यांनी सायबर शाखेत तक्रार केली होती .