विशेष लोकलसाठी महिला उतरल्या रुळांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:34 PM2018-11-01T17:34:58+5:302018-11-01T17:35:19+5:30
भार्इंदर स्थानकातून अंधेरीसाठी सुरु झालेल्या नविन लोकल वरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगला आहे.
मीरारोड - आज गुरुवार १ नोव्हेंबर पासून भार्इंदर स्थानकातून अंधेरीसाठी सुरु झालेल्या नविन लोकल वरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगला आहे. दुसरीकडे भार्इंदरहून सुटणारी महिला विशेष लोकल मात्र विरारहून केल्याने संतप्त महिला प्रवाशांनी साखळी ओढली तसेच रुळावर उतरून आंदोलन केले.
सकाळी ९.०६ ची भार्इंदर - चर्चगेट महिला स्पेशल लोकल आज पासुन भार्इंदर वरुन सोडणे बंद करुन ती लोकल विरार वरुन सोडण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त महिला प्रवाशांनी या निषेधार्थ सकाळी भार्इंदर स्थानकात आलेल्या लोकलची साखळी ओढली. तसेच रेल्वे रुळा वर उतरुन आंदोलन केले. महिला प्रवाशी रुळावर उतरल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. महिलांना बाजुला करण्यात आले. या घटनेने लोकल ५ मिनिटे थांबली होती.
सकाळी गर्दीच्या वेळी सदर महिला विशेष गाडी भार्इंदर व मीरारोड मधील प्रवाशांसह महाविद्यालीयन विद्यार्थीनींना खुपच दिलासादायक होती. भार्इंदर मध्येच ही लोकल भरायची. पण विरार वरुन लोकल सोडल्याने महिला प्रवाशांना बसायला तर सोडा आत शिरायलापण कसरत करावी लागली. मीरारोडच्या महिला प्रवाशांचे सुध्दा हाल झाले. संतप्त महिलांनी भाजपा व सेनेच्या श्रेयवादासाठी जमलेल्यांना महिला लोकल रद्द केल्या बाबत जाब विचारला. महिला लोकल पुन्हा भार्इंदर स्थानकातुन सुरु करा अशी मागणी केली.
दरम्यान भार्इंदर रेल्वे स्थानकातुन आज १ नोव्हेंबर पासुन सकाळी ८.५० वा. ची भार्इंदर - अंधेरी ही नविन लोकल सुरु करण्यात आली. या लोकल सुरु झाल्या बद्दल आज सकाळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्रेहल सावंत, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, श्रेया साळवी, गटनेते हरिश्श्चंद्र आमगावकर, शहर प्रमुख प्रशांत पालांडे, लक्ष्मण जंगम, शहर संघटक विनया खेडसकर आदींनी भार्इंदर रेल्वे स्थानकात नव्याने सुरु झालेल्या ८.५० च्या भार्इंदर - अंधेरी लोकलला झेंडा दाखवला.
तर भाजपाच्या महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, स्थायी समिती सभापती अॅड. रवी व्यास, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, डॉ. सुशील अग्रवाल आदिंनी त्याच लोकलला झेंडा दाखवत प्रवाशांना लाडु वाटले. महापौर व उपनगरीय रेल उपयोगकर्ता समिती सदस्य यांनी लोकल सुरु करण्यासाठी मागणी केल्याचे व्यास, पाटील यांनी सांगीतले.
रेल्वे यंत्रणा खासदारांशी संबंीधत असुन मीरा भार्इंदरकरांच्या सोयीसाठी ८.५० ची नविन लोकल, मीरारोड स्थानकात वातानुकुलीत लोकल ला थांबा देण्या करीता आपण सतत पत्रव्यव्हार व बैठकां मध्ये मागणी केल्याचे खा. विचारे यांनी म्हटले आहे. महिला स्पेशल लोकल पुन्हा भाईंदर मधुन सोडण्यासाठी रेल्वे प्रशासना कडे मागणी करणार आहे. सकाळी ५.२५ वा. ची बोरीवली वरुन विरारला जाणारी लोकल आज पासुन भार्इंदर वरुन सुटणार. सकाळी ६.१७ वा . ची बोरीवली वरुन येणारी भार्इंदर - चर्चगेट लोकल सुध्दा आज पासुन ६.१५ वा. भार्इंदर वरुन सुटल्याचे ते म्हणाले.