महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 10:20 PM2017-09-06T22:20:42+5:302017-09-06T22:20:56+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (21, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली.
ठाणे, दि. 6 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (21, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या सारिका या 2014 मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्या होत्या. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ठाणे शहर आयुक्तालयातील मुख्यालयात नेमणूक मिळाली होती. अविवाहित असल्यामुळे दोन ते तीन सहकारी महिला कॉन्स्टेबलसमवेत त्या कळव्यातील मनीषानगर भागात राहत होत्या. बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्यामुळे रात्री 9पर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला नव्हता. कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी चिठ्ठीही मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा मृतदेह दिला जाणार आहे.
...........................
तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर पडला...
यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार सारिका आणि तिचा भावी पती मनीषानगरमधील घरातच होते. एक फोन आल्यामुळे तो बाहेर पडला. त्याच वेळी तिने घरात हा गळफास घेतला. फोनवरील संभाषण संपल्यानंतर त्याने खिडकीतून आत पाहिले, त्या वेळी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर, त्याने धावाधाव करत पोलीस आणि शेजा-यांना बोलावले. तोपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता. या दोघांचे दिवाळीमध्ये लग्न होणार होते. दोघेही एकाच गावचे आहेत. दोन्ही घरच्या संमतीनेच हे लग्न जुळले होते. मग, अशी कोणती चर्चा झाली की, तो बाहेर गेल्यानंतर तिने इकडे आत्महत्या केली. या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.