अंबरनाथमध्ये लसीसाठी रात्री नऊ वाजल्यापासून महिला रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:05+5:302021-08-24T04:44:05+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट देण्याच्या अनुषंगाने एक हजार महिलांचे लसीकरण करण्याचा संकल्प राबविला होता. हा संकल्प ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट देण्याच्या अनुषंगाने एक हजार महिलांचे लसीकरण करण्याचा संकल्प राबविला होता. हा संकल्प पालिकेने पूर्ण केला असून एक हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र या लसीकरणासाठी महिलांनी आदल्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या, तर दुसरीकडे बदलापुरातही असाच उपक्रम राबवला होता, मात्र या महिला विशेष लसीकरणादरम्यान राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे केंद्रावर गोंधळ झाला.
अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी एक हजार महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली होती. या मोहिमेंतर्गत दिवसभरात ९८० हून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले. या संधीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी देखील रात्रभर रांगेत उभे राहून टोकन मिळविले. रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर रांगेत उभे राहून या महिलांनी सकाळी लस घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. रांगेतील पहिल्या २०० महिलांना थेट लसीकरणासाठी नेण्यात आले, तर उर्वरित ८०० महिलांना टोकनचे वाटप करण्यात आले होते.
लसीकरणादरम्यान कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी पालिकेने चोख व्यवस्था केली होती, मात्र टोकनसाठी महिला रात्रभर रांगेत उभ्या राहतील याची कल्पना पालिका प्रशासनाला आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांसाठी कोणतीही खास व्यवस्था केली नव्हती.
टोकन सिस्टीम असली तरी वशिलेबाजी करून टोकन देण्याचा प्रकार आणि लसीकरणासाठी थेट प्रवेश देण्याचा प्रकार हा सोमवारीदेखील सुरू होता. सकाळी उशिरा टोकन घेण्यासाठी आलेल्या महिलांना टोकन न घेताच माघारी फिरावे लागले. सकाळी नऊ वाजताच सगळे टोकन वाटून पूर्ण झाले होते. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतही लसीकरण मोहीम सुरू होती.