... अन रात्री महिला धावल्या
By admin | Published: February 21, 2017 05:55 AM2017-02-21T05:55:37+5:302017-02-21T05:55:37+5:30
महिलांनी कामाशिवाय रात्री उशीरापर्यंत उगाचच घराबाहेर रेंगाळू नये, असा एक सूर आजही ऐकू येतो. हेच मत
ठाणे : महिलांनी कामाशिवाय रात्री उशीरापर्यंत उगाचच घराबाहेर रेंगाळू नये, असा एक सूर आजही ऐकू येतो. हेच मत बदलण्यासाठी म्हणून ‘देईव्ही फिअरलेस मिडनाईट वुमेन्स रन’चे आयोजन शनिवारी रात्री ठाण्यात करण्यात आले होते. रात्री ११ वाजता देखील अनेक महिला या उपक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. ठाणे वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.
महिलांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगून जाऊ नये, तर आलेल्या प्रसंगाला निर्भयपणे सामोरे जावे, हा या ‘फिअरलेस मिडनाईट वुमेन्स रन’चा उद्देश असल्याचे आयोजक दोस्ती रिअॅलिटीचे सीएमओ नितिन नागपाल यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी महिलांसाठी उपक्रम आयोजित करणे, हे अत्यंत स्तुत्य आहे. पहिल्यांदाच मी अशाप्रकारे महिलांना रात्री धावताना पाहात असल्याचे, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, बायकांनी यात सहभागी व्हावे यासाठी त्यांच्या नवऱ्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलेले दिसले, हे चांगले चित्र असल्याचेही त्या म्हणाल्या. ठाणे हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. महिलांच्या सुरक्षेकडे आम्ही आवर्जून लक्ष देत असतो. महिलांसाठीच्या अशा उपक्रमांसाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबवणे, हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असल्याचे अभिनेता आणि पिंकेथॉनची मूळ संकल्पना राबवणारे मिलिंद सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)