महिला अत्याचारांकडे गांभीर्याने पाहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:01 AM2020-02-20T00:01:42+5:302020-02-20T00:01:48+5:30
देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती
ठाणे : हल्लीच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असून या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. याकरिता सरकारने आवश्यक तेवढा कडक कायदा आणला, तर आमचे त्याला पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही बुधवारी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीनिमित्ताने ठाण्यात दिली.
सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती ठाणे यांच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याला फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, हिंगणघाटपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची मालिका सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही, गंभीर विषय आहे. त्यामुळे सरकारने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करावा. सरकारने कडक कायदा करताना कुुठेतरी त्याची जरब गुन्हेगारांवर दिसली पाहिजे. सातत्याने बलात्कार, जाळून टाकण्याच्या तसेच अॅसिड फेकण्याच्या घटना घडत आहेत. ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले होते, त्या प्रकारे आताही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. सरकारने याकरिता काही पावले उचलली, तर भाजपाचे सहकार्य असेल, असेही ते म्हणाले. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न सरकारने करावा
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी फडणवीस म्हणाले, मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली. त्याचे जिओ टॅगिंगही झाले. त्याला लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने अॅवॉर्डही दिले आहे. त्याचे संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. परंतु, असे असताना जाणीवपूर्वक जुन्या सरकारने जे केले, ते वाईट केले ते दाखविण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे. माझा या सरकारला सल्ला आहे की, जी मोठी रेषा आम्ही ओढली आहे, ती पुसण्याऐवजी आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी काम झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शंका उपस्थित करून पूर्णपणे जनतेची दिशाभूल केली जात आहे.