इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:32+5:302021-07-10T04:27:32+5:30
कल्याण : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी कल्याणमध्ये महिला काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आले. ...
कल्याण : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी कल्याणमध्ये महिला काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आले. या वेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला. नायब तहसीलदारांना निवेदन सादर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्यांची भेट पाठविण्यात आली.
देशात कोरोनाचे संकट आहे. त्यात बहुतांश लोकांनी स्वत:चे रोजगार, नोकऱ्या गमावल्या आहेत. बहुतांश कुटुंबाचे प्रमुख मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. ही दरवाढ थांबवून त्यांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा उपासमारीला कंटाळून देशातील गरीब आणि सामान्य नागरिक आत्महत्या करतील. त्यासाठी पूर्णपणे केंद्रातील भाजपचे सरकार जबाबदार असेल, असा इशारा या वेळी कुलकर्णी यांनी दिला. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता सरकारने गृहिणींवर शेणाच्या गोवऱ्या वापरण्याची वेळ आणली आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करून देशातील सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी महिला काँग्रेसने केली.
जिल्हा काँग्रेसचे आज आंदोलन
महिला काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन छेडले असताना शनिवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता सहजानंद चौक येथून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.
-----------