ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर महिला दिन विशेष 'तीच्या वेदनेचा हुंकार.. स्टे ट्यूनड'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 04:33 PM2019-03-11T16:33:53+5:302019-03-11T16:40:11+5:30
आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेत प्रत्येक संवेदनेत साथ देणारी स्त्री ही फक्त भावनिकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे.
ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्यानेही हा संपूर्ण आठवडा महिला दिन विशेष साजरा केला.गुरुवारी वाचक कट्ट्यावर 'अभिवाचनातून महानायिकांना सलाम', शुक्रवारी संगीत कट्ट्यावर 'स्वरवंदना प्रस्तुत गीतरामायण हा संपूर्ण महिलांनी सादर केलेला सांगीतिक आविष्कार आणि रविवारी कट्टा क्रमांक ४१९ वर नाट्याविष्कारातून सादर झाला 'ती च्या वेदनेचा हुंकार.. स्टे ट्यूनड'*
तीच्या वेदनेचा हुंकार.. *आई बहीण पत्नी मुलगी म्हणून तिची वेदना.. सामाजिक रुढींच्या आड तिच्यावरील अत्याचाराची वेदना... गावखेड्यात अजूनही अस्तित्व हरवलेल्या स्त्रियांच्या वेदना.. शरीरचक्रातील मासिक पाळीमुळे शारीरिक आणि मानसिक तणावातून आलेली अस्पृश्यतेची वेदना..वखवखल्या नजरा शरीराचा प्रत्येक भाग फक्त भोगनाऱ्या समाजाच्या फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक बलात्काराच्या वेदना.. वेश्या म्हणून तीच अस्तित्व आणि लहान मुलींची त्यात होत असलेली वाढ अन ह्यामुळे ह्या हैवान समाजापुढे हतबल झालेल्या काही न उमललेल्या कळ्यांची वेदना.. देवाने घडवलेली एक सुंदर मूर्ती तिची पूजा व्हावी तिचा सन्मान व्हावा पण तिचा देवाची भेट म्हणून नाही तर भोग म्हणून स्वीकार करणाऱ्या ह्या समाजाप्रती आतल्या आत कोंडून ठेवलेल्या आसवांची, एक स्त्री म्हणून पडलेल्या प्रश्नांची त्यांच्या हरवलेल्या उत्तरांची, सर्व काही समजूनही व्यक्त न होणाऱ्या म्युट भावनांची किंकाळी.. सहनशक्तीचा पलीकडेही गेलेल्या आजवरच्या वेदनांचा शब्दरूपी आविष्कार म्हणजे चेतन पवार ह्यांच्या नारी जातीच्या अस्तित्वाची जाण करून देताना काळजाला भिडणाऱ्या कविता आणि त्याच कवितांचा नाट्याविष्कार म्हणजे चेतन पवार दिग्दर्शित ती च्या 'वेदनांचा हुंकार...स्टे ट्यूनड'. 'तीच्या वेदनेचा हुंकार.. स्टे ट्यूनड' एकांकिकेत प्रत्येक ओळ प्रत्येक सादरीकरण प्रत्येक प्रसंग हे आजच्या प्रगत युगात स्त्रीच्या अस्तित्वावरील त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आयुष्यात काही स्पष्ट काही अस्पष्ट समस्यांना प्रेक्षकांसमोर सक्षमतेने मांडण्याचा प्रयत्न अश्वत्थ नाट्यसमूह, कल्याणच्या सर्व कलाकारांनी केला.
सदर एकांकिकेत *अपूर्वा गायकवाड, विशाखा पांगम, जुई म्हादनाक ,पूजा ढावरे, अंबिका सारंग* ह्या महिला कलाकारांनी आपली कला सादर केली.सादर एकांकिकेची *प्रकाशयोजना चेतन पवार व संगीत संयोजन अजिंक्य प्रधान आणि विशाल घनघाव* ह्यांनी केले. सदर एकांकिकेनंतर महिला दिन विशेष सदरात कट्ट्याची कलाकार रोहिणी थोरात हिने परेश दळवी लिखित आणि कदिर शेख दिग्दर्शित 'तूच आमच्या पंढरीची रखुमाई' ह्या कलाकृतीचे सादरीकरण केले.अभिनय कट्ट्याच्या प्रवासात किरण नाकतींसोबत सदैव उभ्या असणाऱ्या आणि दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती ह्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भावनेतून निर्माण झालेली काव्यात्मक कलाकृती म्हणजे 'तूच आमच्या पंढरीची रखुमाई'.* सर्व कलाकारांच्या भावना ह्या कलाकृतीतून रोहिणी थोरात हिने सादर केल्या. आपल्या आयुष्यात आपली आई ते आपली मुलगी सर्वच नाती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात.जग प्रगत होतंय स्त्री सुद्धा प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करतेय.पण सामाजिक रूढी, परंपरा, पुरुषप्रधान संस्कृतीचा आंधळा अहंकार कुठेतरी ह्या वेदनांना कारणीभूत ठरतो हे बदलणं गरजेचे आहे. अशा प्रबोधनात्मक कलाकृतीतून ते समाजासमोर मांडणं हीच बदलाची सुरुवात आहे असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. महिला दिन विशेष कट्टा क्रमांक ४१९ ची सुरुवात ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी सुनंदा गायकवाड ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याची कलाकार रोहिणी थोरात हिने केले.