महिला दिनीच महिलेने केली इच्छामरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:54+5:302021-03-09T04:43:54+5:30
ठाणे : पाच महिन्यांपूर्वी आपल्या गतिमंद मुलाचा दिव्यांग दाखला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेलेल्या एका महिलेला सुरक्षारक्षकांनी मारहाण ...
ठाणे : पाच महिन्यांपूर्वी आपल्या गतिमंद मुलाचा दिव्यांग दाखला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेलेल्या एका महिलेला सुरक्षारक्षकांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज असतानाही पोलिसांनी तक्रार आणि चौकशीत तथ्य नसल्याचे कारण पुढे करून ती निकाली काढल्याने हताश झालेल्या महिलेने न्याय मिळत नसल्याने आपणाला कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
शबनम रैन असे या महिलेचे नाव आहे. रशीद कम्पाउंड, कौसा, मुंब्रा येथे त्या राहावयास आहेत. त्यांचा नावेद हा मुलगा गतिमंद आहे. त्याला शासकीय मदत मिळावी, या हेतूने गेले अनेक महिने त्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खेपा मारत होत्या. ४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्या दिव्यांग दाखला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शबनम रैन यांच्याकडे पाल्याचा जन्मपत्र, शिधापत्रिका, वीजबिल, घराचा भाडेकरार आदी कागदपत्रांची मागणी केली. वास्तविक पाहता, दिव्यांग सुधारणा कायद्यानुसार केवळ आधार कार्ड आणि शिधापत्रिका देऊन दिव्यांग दाखला मिळत असल्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले. त्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी मोबाइल काढून सदर प्रकाराचे शूटिंग करण्याचा प्रयत्न केला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून उपस्थित असलेल्या पुरुष व स्त्री सुरक्षारक्षक यांनी हातातील मोबाइल खेचून त्यांना धक्काबुक्की करून मारझोड केली. याची तक्रार करण्यास कळवा पोलीस ठाण्यात गेल्या असता तेथील पोलीस अधिकाऱ्याने मोबाइलमधील चित्रीकरणही डीलीट केले. त्यामुळे त्यांनी माहिती अधिकारात रुग्णालयाकडून चित्रीकरण घेऊन ते पोलिसांना दिले. तरीही, चौकशीमध्ये तथ्य नसल्याचे कारण पुढे करून कळवा पोलिसांनी ही तक्रार निकाली काढली. या प्रकारामुळे आपण हताश झालो असून, आपणाला न्याय द्यावा अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.