पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:36+5:302021-07-02T04:27:36+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं ३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी गुरुवारी डॉ. ...
उल्हासनगर : कॅम्प नं ३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याखाली ठिय्या आंदोलन केले. एका आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.
उल्हासनगरात पाणीपुरवठ्याचे वितरण असमान होत असून काही ठिकाणी दिवसाला दोन वेळा तर पूर्वेला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांत संताप आहे. संतप्त महिलांनी चोपडा कोर्ट चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्याखाली ठिय्या आंदोलन केले. पाणी द्या, पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही महिला व नागरिक ऐकत नव्हते.
कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांपैकी काही जणांना कार्यालयात चर्चेला बोलावले. जुन्या जलकुंभात पुरेसा पाणीसाठा जमा होत नसल्याने व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने चोपडा कोर्ट व आंबेडकरनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती दिली. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असले तरी एक आठवडा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी लागेल, असे रहेजा म्हणाले. पूर्वेतील बहुतांश भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, नागरिकांत खदखद आहे.