महिला कैदी, किन्नरांना पदवीसाठी दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:24 AM2019-05-19T00:24:52+5:302019-05-19T00:25:00+5:30

एसएनडीटी महाविद्यालयाचा उपक्रम; कल्याणच्या आधारवाडी कारागृहापासून सुरुवात

Women's prisoners, shemals, open doors for graduation | महिला कैदी, किन्नरांना पदवीसाठी दरवाजे खुले

महिला कैदी, किन्नरांना पदवीसाठी दरवाजे खुले

Next

- जान्हवी मोर्ये।


डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कारागृहातील महिला कैदी आणि किन्नर यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. पदवीच्या प्रथम वर्षाकरिता त्यांना प्रवेश देण्यापूर्वी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे महिला परीक्षेसाठी जोमात तयारी करत आहेत. महिला कैदी आणि किन्नर समाजाला शिक्षण देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.


एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाते. जामीन नाकारलेल्या महिला आरोपी कारागृहात कच्च्या कैदी (अंडर ट्रायल) संबोधल्या जातात. या महिला कारागृहात केवळ बसून असतात. कधीकधी तर त्यांच्यात भांडणेही होतात. अशा महिलांना शिक्षण दिल्यास कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांना एक चांगले आयुष्य जगता येईल. स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, असा विचार एसएनडीटी महाविद्यालयाच्या दुरस्थ शिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पुरी यांच्या मनात आला. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी डोंबिवलीतील एसएनडीटी महाविद्यालयातील मनीषा आचरेकर यांना एक पत्र दिले. ते पत्र घेऊन आचरेकर आधारवाडी कारागृहात गेल्या. या कामात त्यांना अ‍ॅड. तृप्ती पाटील यांचीही मदत झाली. पाटील या २०१४ ते १६ या कालावधीत आधारवाडी कारागृहात ‘लीगल एड्स क्लिनिक’च्या माध्यमातून जोडल्या होत्या. कारागृहाच्या भेटीत त्यांना महिला कैद्यांना शिक्षण दिल्यास त्यांचा वेळ सत्कारणी लागेल, असे वाटले. त्यातच, एसएनडीटी महाविद्यालयांनी दिलेली संधी हा एक दुग्धशर्करा योगच होता. आचरेकर आणि पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. २४ महिला कैद्यांनी पुढील शिक्षणाची तयारी दर्शवली आहे.

ज्या महिलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, तसेच ज्यांना किमान लिहितावाचता येते, अशा महिलांना आता पदवी मिळवता येणार आहे. या महिला कैद्यांमध्ये काही जणी सातवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांना पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याची तयारी कारागृहात मोठ्या जोमाने सुरू आहे. विद्यापीठाकडून महिलांना त्याकरिता मार्गदर्शन केले जात आहे. हे मार्गदर्शन करताना कारागृहाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या महिला कैद्यांचे शिक्षण पूर्ण झाले किंवा त्यांना जामीन मिळाल्यानंतरही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिलांनी आपला पत्ता दिल्यास विद्यापीठातर्फे त्यांना नोट्स पुरवल्या जाणार आहेत.

पुरी यांनी भरली फी
महिला कैदी आणि किन्नर समाजातील व्यक्तींची महाविद्यालयीन शिक्षणाची फी पुरी यांनी भरली आहे. साधारणपणे १५०० रुपये फी या अभ्यासक्रमासाठी आहे. या कै द्यांना शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाशिवाय त्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचीही निवड करता येणार आहे.

Web Title: Women's prisoners, shemals, open doors for graduation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.