हंडा घेऊन महिलांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:04 AM2017-08-04T02:04:41+5:302017-08-04T02:04:41+5:30
भरपावसाळ्यात शहरातील नांदिवली, देसलेपाडा, भोपर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
डोंबिवली : भरपावसाळ्यात शहरातील नांदिवली, देसलेपाडा, भोपर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. केडीएमसीकडून कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतीही ठोस कृती होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी नांदिवली टेकडी परिसरातील महिलांनी हंडा-कळशी घेऊन महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली. तसेच १७ आॅगस्टला इंदिरा गांधी चौकात उपोषण छेडण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी बुधवारी येऊन काय साध्य झाले, असा प्रश्न विचारत महिलांनी हंडा-कळशीमध्ये पावसाचे पाणी साठवून ते अधिकाºयांना देण्याचा मानस व्यक्त केला. आम्हाला पाणी हवेच. हजारो रुपयांची पाणीबिले महापालिका वसूल करतेच ना? मग, त्या बदल्यात पाणी कुठे आहे? आधी पाणी द्या, मग बिल मागा, असा टाहो महिलांनी केला. केडीएमसीकडून कोणतीही सुविधा मिळत नाही, असे सांगत आरोग्य व पाण्याची दैना यापूर्वी कधीही झाली नव्हती. एकीकडे सगळी धरणे भरल्याचे ऐकायला येते, तर पाणी गेले कुठे, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाºयांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, बुधवारी रात्रीही रहिवाशांनी पाणीप्रश्नाबाबत बैठक घेतली. त्यात महिला साखळी उपोषण, तर प्रश्न पूर्ण सुटेपर्यंत पुरुष उपोषण करतील, असे ठरवण्यात आले. १७ आॅगस्टला इंदिरा गांधी चौकात उपोषण करण्याचे ठरवण्याचा निर्धारही केला आहे.