पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिलांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:20 AM2021-03-11T00:20:05+5:302021-03-11T00:20:28+5:30
उल्हासनगरवासीय त्रस्त : हंडाभर पाण्यासाठी सुरु आहे वणवण
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहर पूर्वेतील दुर्गादेवी पाडा, भावेश कॉलनी, अशोक पाटील कॉलनी, साई प्रसाद कॉलनी, ज्ञानामृत शाळेजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.
शहर पूर्वेच्या अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असून दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे करूनही टंचाई कायम होती. अखेर मंगळवारी महिलांनी नेताजी चौकातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले.
पूर्वेतील सुभाष टेकडी परिसरासह अन्य परिसरातील पाणीपुरवठ्यबाबत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी महापालिकेत गेल्या शुक्रवारी नागरिक व पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, काही कारणास्तव प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दोनच दिवसांनी संतप्त महिलांना पाणीटंचाईच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करावे लागले.
शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक विभागांत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुर्गापाड्यासह अन्य विभागातील अनेक घरांचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे १५ दिवसांपासून अचानक खंडित केला आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी संताप व्यक्त केला असून, पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
पाणीपुरवठा होणार पूर्ववत - रहेजा
शहरातील दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणात जलवाहिन्यांना गळती लागल्याने, खंडित होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन गळती लागलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सांगितले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. जे. रहेजा यांनी दिली.