महिला स्वच्छतागृहे आवश्यकच
By admin | Published: March 5, 2017 03:28 AM2017-03-05T03:28:32+5:302017-03-05T03:28:32+5:30
कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात स्त्रिया घराबाहेर पडतात. तेथे जशा त्या सुरक्षितह असाव्या लागतात. तितकीच स्वच्छतागृहासारखी त्यांची प्राथमिक गरज भागवण्याची
ठाणे : कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात स्त्रिया घराबाहेर पडतात. तेथे जशा त्या सुरक्षितह असाव्या लागतात. तितकीच स्वच्छतागृहासारखी त्यांची प्राथमिक गरज भागवण्याची सुविधा उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नोकरीधंदा करणाऱ्या महिलांमुळेही शहराच्या आर्थिक विकासात भर पडते. अशा महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे असावी. नव्हे, असलीच पाहिजेत, असे मत ‘कोरो’ -‘राइट टू पी’च्या समन्वयक सुप्रिया सोनार यांनी मांडले.
केवळ तंत्रज्ञानाने विकसित झालेले शहर स्मार्ट नसते, तर स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक असे शहर स्मार्ट ठरते, असेही त्या म्हणाल्या.
ठाणे महापालिका नागरिकांच्या सूचना समजावून घेऊन त्याचा समावेश अर्थसंकल्पात करणार आहे. शहराच्या लोकसंख्येत निम्म्या प्रमाणात असलेल्या महिलांची ही मागणी प्राधान्याने पूर्ण व्हायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
ठाणे, मुंबईसारख्या मोठ्या महानगरांत नोकरी करणाऱ्या महिलांची चौथी पिढी आहे. त्यातही केवळ सहा टक्के महिला या कार्यालयांत नोकरी करतात. सुमारे ९४ टक्के महिला कचरावेचक, पेपरविक्री, साफसफाई, मजुरी अशी कामे करतात. अशा महिलांना दिवसभरात स्वच्छतागृहाची आवश्यकता अधिक भासते. मात्र, ती उपलब्ध असतेच, असे नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावी. मोठ्या महानगरांमध्ये साधारणत: दर दोन किलोमीटरवर एक स्वच्छतागृह असावे, अशी अपेक्षा आहे. शहराची एकूण लोकसंख्या, त्यातील महिलांचे प्रमाण, त्यात्या विभागातील महिलांची रहदारी यानुसार ही मागणी बदलू शकते, असे सोनार यांनी सांगितले.
स्वच्छतागृहांसाठी जागा सुचवताना किंवा ठरवताना अर्थातच त्या परिसरातील लोकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. फुटपाथ म्हणजे लोकांच्या ‘राइट टू वॉक’चा हक्क असल्याने फुटपाथवरील जागा सुचवली जाऊ शकत नाही. प्रभागातील एखाद्या जागेला स्थानिक लोकप्रतिनिधींचाही विरोध असू शकतो. अशा वेळी ज्यांच्यासाठी स्वच्छतागृहे बांधली जात आहेत, त्यांनी यासाठी एकत्र यावे. त्यानंतर, प्रभाग अधिकाऱ्यांनी पाहणी करून आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्याला मंजुरी दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. आपल्याकडे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. पुरुष आणि महिलांसाठी एकत्रितच असतात. त्यातही महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत ५० टक्केही नसते, अशी अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
तीन वर्षांनंतरही निराशा : मुळात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधायची म्हटले की, त्याला कोणी नाही म्हणत नाही. आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतागृहासाठी काम करताना नगरसेवक, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि मुख्यमंत्री असा प्रवास झाला. गेली तीन वर्षे सतत जेंडर बजेटमध्येही यासाठी तरतूद झाली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही, याचा खेद वाटतो. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्या गरजा लक्षात घेत स्वच्छतागृहे उभारावी, असे सोनार यांनी स्पष्ट केले.
सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया
ठाणे : श्रीरंग, वृंदावन या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा दरवर्षी पावसाळा आला की, चर्चिला जातो. स्थानिक नागरिक प्रशासनाकडे धाव घेतात. मात्र, त्याबाबत योग्य तो निर्णय झाला पाहिजे. वृंदावन ते ठाणे स्टेशन मार्गासह वृंदावन ते मुलुंड चेकनाका मार्गावरील बसच्या फेऱ्याही वाढवल्या पाहिजे.
- ऋता बुरकुले, प्रभाग क्रमांक-११
शहराचे मध्यवर्ती आणि गजबजलेले ठिकाण म्हणून मासुंदा तलाव आणि जांभळीनाका परिसर ओळखला जातो. मात्र, तलाव तसेच जांभळीनाका परिसरात गर्दुल्ले, वेश्यांचा मोठा वावर असतो. सायंकाळच्या दरम्यान परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले, तरी त्यांचा त्रास होतो. तसेच या परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय शोधणे गरजेचे आहे. पार्र्किं गसाठी विशेष पार्र्किं ग झोन तयार करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजे.
- राजेश सावंत, प्रभाग क्रमांक-२१
परिसरात पदपथांवर दिवे लावण्याची गरज आहे. येथे रस्त्यावर धंदा थाटून बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रस्ता अडला जातो. संध्याकाळच्या वेळी तर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊन रस्ता वाहतूक आणि रहदारीसाठी मोकळा ठेवला पाहिजे. प्रभागातील बैठ्या चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.
- पराग वायदंडे, प्रभाग क्रमांक-१५
कळवानाका परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय शोधण्याची गरज आहे. कळवा हॉस्पिटलच्या परिसरात कायम वर्दळ असते. मात्र, कळवा ते ठाणे रेल्वे स्थानक मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची संख्या आणि फेऱ्याही तुलनेने कमी आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांची मुजोरी वाढते. मात्र, टीएमटीच्या फेऱ्या वाढल्या तर अनेकांना फायदा होईल. रिक्षांसाठी स्टॅण्ड असूनही अयोग्य पद्धतीने त्या रस्त्यात मध्येच थांबवल्या जातात. परिणामी, अनेकदा अपघातांचे प्रकार घडतात. या मुजोर रिक्षाचालकांवर अंकुश ठेवला पाहिजे. - अलका राऊत,
प्रभाग क्रमांक-२३