पाण्यासाठी महिलांचा घेराव; नांदिवलीत संताप
By admin | Published: March 15, 2016 01:06 AM2016-03-15T01:06:33+5:302016-03-15T01:06:33+5:30
डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या.
कल्याण : डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या आंदोलनामुळे एक प्रकारे घरचा आहेर मिळाला आहे. शहरी-ग्रामीण असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागांत पाणीकपात लागू झाली आहे. ग्रामीण भागात बुधवारी मध्यरात्री १२ ते शनिवार पहाटे ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. सलग अडीच दिवस पाणीकपात केली जात आहे. असे असतानाही शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ६ पर्यंत असा पाणीपुरवठाही बंद ठेवला जात आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, पाच दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी म्हात्रे यांच्या सागाव येथील कार्यालयात धडक देत त्यांना घेराव घातला.
पाणीटंचाईबाबत जाब विचारताना सलग पाच दिवस पाणी नसल्याने घरात अन्न शिजले नाही. वडापाव, भजीपाव खाऊन आम्ही दिवस काढत आहोत, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी म्हात्रे यांना सांगितले.
म्हात्रे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची पत्नी प्रेमा म्हात्रे या पी अॅण्ड टीकॉलनी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. म्हात्रे यांच्याकडून शहरी-ग्रामीण दुजाभाव केला जात आहे, असा आरोप झाल्याने त्यांच्याच सत्ताधारी शिवसेनेचा केडीएमसी प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आठवड्याच्या १६८ तासांपैकी ग्रामीण भागाला केवळ ५० ते ६० तास पाणीपुरवठा केला जात असल्याकडेत्यांनी लक्ष वेधले. शहरी भागाला झुकते माप दिले जात आहे. प्रशासनाची दुजाभावाची भूमिका योग्य नाही. पाण्याचे समान वाटप होणे आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोताच्या उपाययोजना सुचवल्या होत्या, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतही मोर्चा
कल्याण पूर्वेतही भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दूषित पाणीपुरवठा
एकीकडे अभूतपूर्व पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे अळ्या आणि किडेमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिमेकडील अन्नपूर्णानगर आणि आधारवाडी परिसरात हा दूषित पुरवठा होतो. पूर्वेतील भागांमध्येही दूषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
यासंदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.