कौतुकास्पद! एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:11 PM2019-05-16T22:11:40+5:302019-05-16T22:12:09+5:30
दोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची असलेली बॅग चेंबूरमधील छाया शेळके ही तरुणी तुतारी एक्स्प्रेसमध्ये विसरली.
ठाणे: दोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची असलेली बॅग चेंबूरमधील छाया शेळके ही तरुणी तुतारी एक्स्प्रेसमध्ये विसरली. ती बॅग रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या तासांमध्ये त्या तरुणीला ठाणे रेल्वे स्थानकात स्टेशन उपप्रबंधक रवि नांदूरकर यांनी गुरुवारी सकाळी परत केली. चेंबूर येथे राहणा-या छाया शेळके या आई-वडिलांसह कोकणात लग्नासाठी गेल्या होत्या. बुधवारी रात्री ते तिघे तुतारी एक्स्प्रेसने मुंबईकडे येण्यास निघाले.
वैभववाडी येथून बसल्यावर गुरुवारी पहाटे ते तिघे पनवेल येथे चेंबूरला जाण्यासाठी उतरले. दरम्यान इतर वस्तू जास्त असल्याने ते गाडीतून उतरवताना झालेल्या घाईगडबडीत एक बॅग हे कुटुंब एक्स्प्रेसमध्ये विसरले. गाडी सुटल्यावर खांद्यातील बॅग दिसत नसल्याचे लक्षात येतात. त्यांनी पनवेल रेल्वे प्रबंधक कार्यालयात धाव घेत, बॅग एक्स्प्रेसच्या डब्यात राहिल्याची माहिती दिली. तातडीने पनवेल रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात फोन करून माहिती दिली. त्यानुसार ठाण्यातील पाईंटमन मनोहर कुमार याने ठाण्यात गाडी आल्यावर सांगितलेल्या डब्ब्याची तपासणी केल्यावर सुदैवाने कोणीही बॅग न नेल्याने गाडीत मिळून आल्याची माहिती पनवेल प्रंबधक कार्यालयाला दिली.
शेळके या ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आल्यावर त्यांची बॅग त्यांच्या खातरजमा झाल्यानंतर स्वाधीन केली. त्या बॅगेत एक नेकलेस, दोन बांगड्या आणि दोन अंगठ्या असा अंदाजे दोन लाखांचा सोन्याचा ऐवज आणि इतर वस्तू ठाणे आरपीएफ जवान प्रदीपकुमार यांच्या समोर दिल्याची माहिती उपप्रबंधक नांदूरकर यांनी दिली. बॅग मिळाल्याबाबत शेळके कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.