मनसे-भाजप समीकरण जुळल्यास आश्चर्य कसले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:22 AM2020-01-19T01:22:03+5:302020-01-19T01:22:33+5:30
विधानसभा किंवा महापालिका निवडणुकीत मनसेला यश मिळाले नसले तरी मतदारराजा हाच मनसेचे भवितव्य निश्चित करणार आहे.
- निरंजन डावखरे
राज्यात या नव्या समीकरणाचे बरेच कुतूहल वाढलेले आहे. राजकारणात वेगवेगळ्या शक्यतांना वाव असतो. अर्थात, हा एक धोरणात्मक निर्णय असल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. निवडणुका मग त्या कोणत्याही असोत, प्रत्येक निवडणुकीत मतदाराने वेगवेगळा कौल दिलेला असतो. लोकसभेच्या निवडणुकीत वेगळा कौल दिसून आला, तर विधानसभा निवडणुकीत त्यापेक्षा वेगळा कौल दिसून आला. महापालिका, नगरपालिका निवडणुकीतही मतदारराजा हा नेहमीच वेगळा कौल देताना दिसून आला आहे. त्यामुळे विधानसभा किंवा महापालिका निवडणुकीत मनसेला यश मिळाले नसले तरी मतदारराजा हाच मनसेचे भवितव्य निश्चित करणार आहे.
भाजप हा दुसऱ्याच्या खांद्यावर आपले ओझे टाकून चालणारा पक्ष नाही. आमचा पक्ष हा मजबूत पक्ष आहे, त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही त्याच जोमाने सामोरे जाणार आहोत. यासाठी आम्हाला दुसºयाच्या खांद्यांवर ओझे टाकण्याची मुळीच इच्छा नाही. मनसे आणि भाजपची विचारधारा वेगळ्या आहेत, हे मान्य आहे. मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दादेखील यात कदाचित येऊ शकतो. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसते, हे यापूर्वीही आपण पाहिलेले आहे. त्यामुळे वेगळी समीकरणे जुळत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो राज्य पातळीवरील वरिष्ठ मंडळी घेतील.
(लेखक ठाणे शहर भाजप अध्यक्ष)
- शब्दांकन : अजित मांडके