वसई-ठाणे-कल्याण जलवाहतुकीसाठी १० जेट्टींचे काम लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:39+5:302021-07-25T04:33:39+5:30
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेली वसई-ठाणे-कल्याण जलवाहतूक आता लवकरच सुरू होईल, असा दावा खासदार ...
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेली वसई-ठाणे-कल्याण जलवाहतूक आता लवकरच सुरू होईल, असा दावा खासदार राजन विचारे यांनी केला. शुक्रवारी केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन जलवाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या १० जेट्टींचे काम सुरू करण्याची त्यांची मागणी मान्य करून सोनोवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जेट्टींचे काम तत्काळ सुरू करण्यास मंजुरी देऊन अनुदान वर्ग करण्याचे आदेश दिले.
ठाणे जिल्ह्याला लाभलेला खाडीकिनारा लक्षात घेऊन जलवाहतूक सुरू करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे २८ जुलै २०१६ रोजी सादरीकरण झाले. सात महानगरपालिकांना जोडणारा हा जलवाहतूक प्रकल्प असून, पहिल्या टप्प्यासाठी १०० टक्के व दुसऱ्या टप्प्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने प्रकल्प अहवाल तयार करून ऑक्टोबर २०१८ ला केंद्र शासनाला सादर करून मंजुरी मिळवली. परंतु, यासाठी प्रत्यक्ष लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागत होता. त्यानुसार या कामाला पुन्हा गती देऊन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विचारे यांनी सोनोवाल यांची भेट घेऊन ते सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला परवानगी देऊन अनुदान प्राप्त करून द्यावे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवाल बनविण्यासाठीही अनुदान प्राप्त करून द्यावे जेणेकरून निधीअभावी बंद पडलेले काम सुरु होईल, अशी विनंती केली.
यातील पहिला टप्पा वसई-ठाणे-कल्याण असा असणार आहे व दुसरा टप्पा ठाणे ते मुंबई व व नवी मुंबई असे दोन मार्ग असणार आहेत. पहिल्या टप्प्यातील जेट्टीचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत हाती घेण्यात आले असून, त्यामधील वसई-ठाणे-कल्याण या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी राष्ट्रीय जलमार्ग क्र. ५३ मध्ये जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरिता १० ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो केंद्र शासनास सादर केल्याचे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.