एसआरएच्या २५ योजनांची कामे पाच वर्षांपासून अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:58+5:302021-06-21T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात एसआरए अंतर्गत ७५ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यातील ४५ प्रकल्प पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर ३० प्रकल्पातील २५ प्रकल्पांची कामे २०१६ पासून सुरू असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, तर ५ योजना या पहिल्याच टप्यात असल्याची माहिती उघड झाली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी एसआरए योजनेत २६९ चौरस फुटांचेच घर मिळत होते. तसेच तीनचाच एफएसआय मिळत होता. त्यातही या योजनेची मंजुरी घेण्यासाठी मुंबईच्या खेटा माराव्या लागत होत्या. परंतु, आता वाढीव एफएसआय बरोबर ३०० चौरस फुटांचे घर मिळणार असल्याने आणि ठाण्यात आता एसआरए योजनेचे स्वतंत्र प्राधिकरण झाल्याने या योजनांना चालना तर मिळणार आहेच, शिवाय विकासकही या योजनांसाठी पुढे येतील असा दावा केला जात आहे.
ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेअंतर्गत ठाण्यात ७५ प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या योजनेतील घरे छोटी असल्याने आणि एफएसआयही कमी असल्याने विकासक या योजना राबविण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे या योजनेला काहीशी खीळ बसली होती. मुंबई याच योजनेच्या माध्यमातून चारचा एफएसआय दिला जात होता. तसेच ३०० चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, ठाण्यात मात्र यासाठीचा नियम वेगळा होता. येथे तीनचाच एफएसआय मिळत होता. तसेच २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. परंतु, मागील डिसेंबरमध्ये एसआरए प्राधिकरणाने ठाण्यालाही मुंबईप्रमाणे न्याय देण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार पुढील योजना राबविण्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातील एसआरए योजनेलाही अशाच पद्धतीने न्याय मिळणार असल्याने येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील २५ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहारत २२७ झोपड्पट्ट्या असून, तब्बल २.३२ लाख घरे आहेत, तर नऊ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडी अंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली; मात्र अद्यापही दोन लाख घरांची मागणी कायम आहे. त्यामुळे आता एसआरएच्या योजनेचा लाभ येथील रहिवाशांना मिळू शकणार आहे. दरम्यान, आतापर्यंत एसआरए अंतर्गत ७५ योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ४५ योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली.
-----------------
पाच योजनांच्या केवळ फाईलचा प्रवास
३० योजनांपैकी २५ योजनांची कामे २०१६ पासून सुरू आहेत. परंतु, ही कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एका प्रकल्पासाठी साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी जातो असे सांगितले जाते. परंतु, आता पाच वर्षे उलटूनही या योजनांची कामे पूर्ण झाली नसल्याचेच दिसून आले आहे, तर पाच योजनांच्या केवळ फाईलच अद्याप हलविण्याचे काम सुरू आहे. या योजनांची केवळ प्राथमिक स्वरुपातच कामे सुरू असून, त्या केव्हा पूर्ण होणार हे सांगणे कठीण आहे.