रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत होणार पूर्ण- श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:53 AM2020-08-21T01:53:28+5:302020-08-21T01:53:37+5:30
गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
कल्याण : ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अनंत अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पास गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
ठाण्यापुढील उपनगरीय रेल्वेसेवेतील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा डीआरएम मुंबई कार्यालयात अलीकडेच घेतला. यावेळी रेल्वेचे व्यवस्थापक सलभ गोयल, संचालक संजीव मित्तल, आ. बालाजी किणीकर, ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. दिवा-ठाणे यादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांस २००८ मध्ये मंजुरी मिळाली. प्रकल्प अडचणीत आला होता. २०१४ साली शिंदे खासदार झाल्यावर त्यांनी या प्रकल्पास गती दिली. रेल्वेने मार्गिकांचे आरेखन बदलले व नवे आरेखन सीआरझेडमधून जात होते. त्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक जमीन तर ठाणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत प्रकल्पास गती मिळाली. कोरोनाचे संकट आल्याने प्रकल्पाची डिसेंबर २०२० ही डेडलाइन हुकणार असली, तरी आता मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकाचे रिमॉडेलिंगचे काम मार्गी लावण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या, उपनगरीय गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. रिमॉडेलिंगचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण पत्रीपुलापासून थेट कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.