वरसावे पूल दुरुस्तीचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:36 AM2018-12-08T05:36:04+5:302018-12-08T05:36:12+5:30
वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे.
मीरा रोड : वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे. अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्ट बसवण्याचे काम चिंचोटी व वरसावे पुलाजवळ अजून पूर्ण झाले नसले तरी, प्राधिकरणाने आणखी वाट न पाहता दुरु स्ती सुरु केली आहे. पुलावरील एक मार्गिका बंद करण्यात आली असून, आता एका मार्गिकेवरूनच वाहतूक सुरु आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या या पुलाच्या जॉइंट्स प्लेट्स नादुरु स्त झाल्याने अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाने वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची मागणी केली होती. अखेर पालघर जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढली. वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता पाहता संपूर्ण पूल बंद ठेवण्याऐवजी एक मार्गिका बंद ठेऊन दुरु स्ती काम करणे आणि दुसºया मार्गिकेवरून लहान वाहने सोडणे, असे ठरवण्यात आले.
मोठी वाहने वळवण्यासाठी मनोर येथे दोन ओव्हरहेड गेंटरी उभारल्या आहेत. चिंचोटी येथे दोन व वरसोवा पुलाआधी एक ओव्हरहेड गेंटरी उभारण्याचे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. मनोर येथे साडे तीन मीटर उंचीची तर चिंचोटी व पुलाजवळ सुमारे सव्वादोन मीटर उंचीची ओव्हरहेड गेंटरी उभारणाार आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मोठी वाहने वाडा, शिरसाड व अंजूर फाटामार्गे भिवंडीवरून ठाणे - मुंबईला वळवण्यास सुरवात झाली आहे. दुरुस्तीचे काम मंगळवारीच सुरु करण्यात आले होते; मात्र ते बंद करण्यात आले. शुक्रवारी ते पुन्हा सुरु झाले. पुलावरून एकेरी वाहतूक सुरु झाल्याने वसईच्या दिशेला मोठी वाहतूककोंडी होणार आहे.
>अवजड वाहनांना वाडा, शिरसाड, अंजूरफाटा येथून वळवण्यासह पुलाजवळ वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांसह जिल्हा पोलीस व स्थानिक पोलीस सज्ज आहेत. आयआरबीकडून ट्रॅफिक वार्डन पुरवले जाणार आहेत .
-ए.आर. संकेश्वरी,
वाहतूक पोलीस निरीक्षक
>मंगळवारी सायंकाळपासून पुलाच्या दुरु स्तीचे काम सुरु केले. एक मार्गिका बंद करण्यात आली असून वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली ठेऊन काम करणार आहोत. नाताळची सुट्टी सुरु होणार असल्याने वाहतूक वाढण्याची शक्यता पाहता काम लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
-दिनेश अगरवाल,
विभागीय व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण