महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच कामे करा
By admin | Published: May 9, 2017 01:05 AM2017-05-09T01:05:31+5:302017-05-09T01:05:31+5:30
मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील महासभेने अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार विकासकामे सुरू झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील महासभेने अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार विकासकामे सुरू झाली होती. परंतु, सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला अर्थसंकल्प जोपर्यंत प्रशासनाला सादर केला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करू नये, असे पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहे. त्याची दखल घेऊन आयुक्तांनीदेखील संबंधितांना कोणत्याही स्वरूपाचे नवीन प्रस्ताव तयार करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर वास्तविक पाहता महासभेमध्ये ३० एप्रिलपर्यंत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, महासभेमध्ये मे महिन्यात यावर चर्चा झाली. त्यानुसार, महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार कामे होणे अपेक्षित होते. परंतु, आर्थिक वर्ष सुरू झाल्याने प्रशासनामार्फत आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार शहरात विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करण्यास सुरुवात झाली होती.
परंतु, प्रशासन वादग्रस्त पद्धतीने आणि ठरावीक मंडळींच्या फायद्यासाठी विकास प्रस्ताव तयार करते. सर्वसामान्य ठाणेकरांच्या कामांसाठी मात्र तिजोरीतून पैसा उपलब्ध करून देत नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हे पत्र दिल्याचे महापौरांनी सांगितले. त्या पत्रामुळे प्रशासन आणि शिवसेनेतला वाद आणखी तीव्र झाला आहे. मात्र, सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला अर्थसंकल्प जोपर्यंत प्रशासनाला सादर केला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामांसाठी आर्थिक तरतूद करू नये, अशी भूमिका आता महापौरांनी घेतली आहे. सर्वसामान्य ठाणेकरांच्या अनेक छोट्यामोठ्या मागण्या असतात. त्यासाठी मूळ अर्थसंकल्पात तरतूद नव्हती. सभागृहाने ती करण्याबाबतचा ठराव केला आहे. त्याशिवाय, गेल्या काही वर्षांत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने आर्थिक तरतूद करण्याचे प्रकार वाढत आहेत. काम झाल्यानंतर आर्थिक तरतूद करण्याचे वर्तकनगर येथील प्रकरण नुकतेच चव्हाट्यावर आले होते. माजिवडानाका येथे राष्ट्रध्वज उभारणीच्या कामाला मंजुरी मिळाली नसतानाही ते काम परस्पर ठेकेदार नेमून सुरू केले आहे. काही रस्त्यांची कामे निविदा प्रसिद्ध न करताच केली असून त्याची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. काही विशिष्ट मंडळींना फायद्याचे ठरणाऱ्या प्रस्तावांसाठी प्रशासकीय अधिकारी आग्रही असतात.
सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी निधी नसल्याची ओरड होते. नगरसेवकांना तळागाळातील ठाणेकरांना आवश्यक सुविधा देता याव्यात यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय सभागृहात घेतला आहे. त्यामुळेच सभागृहाने मंजूर केलेला अर्थसंकल्प प्रशासनाकडे पाठवला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामासाठी आर्थिक तरतूद करू नये, अशी महापौरांची भूमिका आहे.