डोंबिवलीतील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट, मनसेचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 07:38 PM2020-09-26T19:38:53+5:302020-09-26T19:39:02+5:30
अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.
कल्याण-डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणा-या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याचा पर्दाफाश मनसेच्या वतीने आज करण्यात आला आहे. खड्डे योग्य प्रकारे बुजविण्यात यावेत. हे काम येत्या दोन दिवसात करण्यात यावे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.
महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्याच्या कामावर महापालिकेकडून 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही रक्कम वर्षभर खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्तीच्या कामावर खर्च केले जाणे अपेक्षित आहे. पावसाळ्य़ात रस्त्यावर खड्डे पडले होते. भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम करता येत नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात होते. तसेच ज्या ठिकाणी खड्डे बुजविले गेले आहेत. त्या कामाचे बिल महापालिकेने संबंधित कंत्राटदारांना दिलेले नाही. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पुलाचे नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्व पश्चिमेची वाहतूक ही ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून सुरू आहे.
या पुलाच्या दिशेने जाणा-या डोंबिवली पूर्वेतील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहे. हे खड्डे महापालिकेने बुजविले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेली खडी, डांबर हे निकृष्ट दर्जाचे आहे. ते हाताने उकरले तर निघते. हे वास्तव दाखविणारा व्हिडीओ मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी तयार केला असून, तो सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. पावसाने उघड घेतली आहे. तरीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने योग्य प्रकारे केलेले नाही. महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामात थुकपट्टीचे काम केले आहे. महापालिकेने येत्या दोन दिवसांत योग्य प्रकारे खड्डे बुजविले नाही तर मनसेच्या वतीने आांदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.