भार्इंदरमध्ये नाल्याचे काम रखडले
By admin | Published: June 10, 2017 01:10 AM2017-06-10T01:10:00+5:302017-06-10T01:10:00+5:30
भार्इंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडीकिनारी जाणाऱ्या रेल्वे समांतर नाल्याचे काम रखडल्याने पहिल्याच पावसात भार्इंदर पूर्व
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडीकिनारी जाणाऱ्या रेल्वे समांतर नाल्याचे काम रखडल्याने पहिल्याच पावसात भार्इंदर पूर्व रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात पाणी साचले. अखेर, नाल्याचे काम अर्धवट असतानाच तो खुला करून पाण्याचा प्रवाह खुला करण्यात आला. विशेष म्हणजे पाऊस जोरात असताना पाणीउपशासाठी केवळ एकच पंप सुरू होता. यामुळे नागरिक संतापले आहेत.
मीरा-भार्इंदर महापालिकेने जेसल पार्क सब वेसाठी येथील रेल्वे समांतर नाला तोडला. सब वेचे काम रखडल्याने नाल्याचे कामही बारगळले, जेणेकरून सांडपाणी ओस्तवाल शॉपिंग सेंटरजवळ अडवून तेथून पंपाने सब वेच्या पलीकडे सोडले जात होते. परंतु, पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण न केल्यास भार्इंदर पूर्वेतील दळवी चाळ, वसई जनता बँक परिसर, बाळाराम पाटील मार्ग आदी भाग पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी पालिकेकडे या नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी तगादा लावला होता.
जेसल पार्क, राहुल पार्क आदी भागांतील हजारो नागरिकांना येजा करण्यासाठीचा हा मुख्य मार्ग आहे. परंतु, सब वे व नाल्याच्या कामामुळे अनेक महिन्यांपासून नागरिकांचा वाहन तसेच पायी येजा करण्याचा मार्गच बंद झाला आहे. वीजपुरवठा करणाऱ्या केबल आदी उघड्यावरच टाकल्या आहेत. चालणेही धोक्याचे झाले आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक आधीच मेटाकुटीला आले आहेत.
पालिकेच्या ढिसाळपणामुळे पावसाळा सुरू झाला, तरी नाल्याचे काम अर्धवटच झालेले आहे. बुधवारी दुपारीही पाटील यांनी नाल्याच्या कामाची पाहणी करून निदान एका बाजूने तरी नाला खुला करा, अशी मागणी केली होती. परंतु, काम अर्धवटच असताना बुधवारी रात्री पावसाने दमदार सुरुवात केल्याने दळवी चाळ, वसई जनता बँक परिसर, बाळाराम पाटील मार्ग आदी ठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, पहाटे ४ च्या सुमारास नाल्याच्या ठिकाणी पाहणी केली असता पाणीउपसा करणारा एकच पंप सुरू होता. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर आणखी तीन पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर, पाणी ओसरले, असे पाटील यांनी सांगितले. पावसाला सुरुवात झाल्याने अखेर अर्धवट अवस्थेतील नाला पाण्यासाठी खुला करण्यात आला. परंतु, तो वरून खुलाच असून आजूबाजूलाही खोदकाम केले आहे.