इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात वर्क फ्रॉम होममुळे भरमसाट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:48 PM2020-09-28T23:48:11+5:302020-09-28T23:48:42+5:30
दुरुस्तीचाही वाढला खर्च : मागणी जास्त, पुरवठा कमी
ठाणे : वर्क फ्रॉम होममुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्याने त्याच्या दरांत भरमसाट वाढ झाली आहे. तसेच, या वस्तूंवर भार पडत असल्यामुळे दुरुस्तीचाही खर्च वाढला असल्याचे दुकानदारांनी सांगितले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती सध्या असल्याने या वस्तूंच्या दरांत वाढ झाली आहे. होलसेल वितरकांकडून चढ्या दराने माल येत असल्याने दुकानदारांना जादा दराने त्या विकाव्या लागत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आली. नोकरदारवर्गाला घरातूनच काम करण्याचे आदेश आल्याने अर्थातच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला. तसेच, नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीमध्येही वाढ झाली. संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, वायफायसाठी राउटर यांची खरेदी लॉकडाऊनकाळात वाढू लागली. यात भर पडली ती आॅनलाइन शिक्षणाची. शाळाशाळांत सरकारने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकवण्याचे आदेश दिल्याने मोबाइल, टॅब यासारख्या वस्तूंच्या वापरात वाढ झाली. या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच, त्यांचे स्पेअरपाटर््स हे ७५ टक्के चायना आणि २५ टक्के इतर देशांतून आयात होत असल्याने या काळात ही आयातही ओसरली. त्यामुळे वस्तूंचा तुटवडा मोठ्या प्रमाणात दुकानदारांना जाणवू लागला. ज्यांच्याकडे या इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्यांचे स्पेअरपार्ट्स मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांनी या वस्तूंच्या दरांत वाढ केली. त्यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.
अशा वाढल्या किमती
१३२ हजारांचा लॅपटॉप ४० हजार रुपयांना विकला जात आहे. संगणकामध्ये पाच हजार ते सात हजारांनी, राउटरमध्ये २०० ते ५०० रुपयांनी वाढ, १० इंचाच्या टॅब्लॉइडमध्ये एक ते दोन हजार रुपयांनी, प्रिंटरमध्ये ५०० ते १००० रुपयांनी वाढ झाली असल्याचे विश्वास डफळे यांनी सांगितले.
२या वस्तूंवर भार वाढत असल्यामुळे त्या बिघडण्याचे प्रमाणदेखील वाढले आणि अर्थातच या वस्तूंच्या दुरुस्तीचा खर्चही पाच टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी सुरू झाली. स्पेअरपार्ट्सचा तुटवडा असल्याने आणि या वस्तूंची परदेशांतून आयात होत नसल्याने एकेका वस्तूंसाठी खूप फिरावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. स्पेअरपार्ट्सदेखील कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे.
अद्यापही स्पेअरपार्ट्स येत नसल्यामुळे परिस्थिती खूप कठीण होत आहे. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वस्तूंच्या आयातीकडे सरकारने गांभीर्याने पाहावे.
- विश्वास डफळे, विक्रेते